कल्याण : महावितरणच्या कल्याण, शहापूर ग्रामीण परिसरातील वीज चोरी शोध मोहिमेतील भरारी पथकांनी तपासणी केली. त्यात टिटवाळा, बल्याणी, कल्याण पूर्वेतील नेवाळी, खंबाळपाडा, पिसवली, शहापूरमधील अघई भागात गावांत १८ ग्राहकांनी मीटरमध्ये छेडछाड केल्याचे आढळले. काहींनी विजेच्या खांबावरून थेट वीज तारा टाकून वीजचोरी केल्याचे आढळले. या वीजचोरांवर मुरबाड व कल्याण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. तपासणीत ६३ लाखांची वीजचोरी उघड झाली.

महावितरणने अचानक पाहणी करून वीज चोरीची प्रकरणे शोधून काढली. वीजचोरी उघड झाल्यानंतर दोषींना वीज युनिटप्रमाणे वीज देयकासह दंडात्मक रक्कम भरणा करण्यास सांगितले जाते. रक्कम न भरल्यास महावितरण वीज चोरांवर गुन्हा दाखल करते.

कल्याण पूर्व परिसरातील नेवाळी, डोंबिवलीजवळील खंबाळपाडा, पिसवली भागात वीज मीटरमध्ये छेडछाड, विजेच्या खांबावरून थेट वीज पुरवठा घेणाऱ्या वीज ग्राहकांविरुद्ध महावितरणच्या पथकाने तपासणी मोहीम राबवली. यावेळी एकूण २६१ वीज चोरीच्या घटना उघडकीस आल्या. वीज चोरट्यांनी २ लाख ८३ हजार युनिटची वीज चोरी केल्याचे आढळून आले. या वीजचोरीचे एकूण मूल्यांकन ६२ लाख ९४ हजार रुपये आहे.

वीज चोरी पकडल्यानंतर संबंधित ग्राहकांना विहित मुदतीत वीज देयक दंडात्मक रकमेसह भरण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्या मुदतीत त्यांनी दंडात्मक रक्कम भरणा केली नाही. त्यामुळे महावितरण कडून वीज कायदा २००३ च्या कलम १३५ अन्वये कल्याण पूर्वेतील मलंगगडलगत नेवाळी येथील समीर जाधव, किशोर जाधव, डोंबिवली जवळील खंबाळपाडा गावातील विकास पवार, पुनम चोरगे, निशांत ढाके, पिसवली गावातील भारत सानप, राम दुगे, धामटन गावातील सुचित्रा सुर्वे या ग्राहकांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

टिटवाळ्यात वीज चोरी

टिटवाळा भागातील बल्याणी डोंगरवाली माता परिसरातील मे. अलफिया डेव्हलपर्स यांनी ६२ हजार रूपयांची, ए. एस. बाबा इलेक्ट्रिकल्स यांनी २४ हजार रूपयांची वीज चोरी, जगदीश मुकुंद धुमाळ यांनी २३ हजार, सुनील बबन शिंदे यांनी १२ हजार, विनायक गणपत पाटील यांनी २४ हजार, दत्तगी देसाई ६ हजार, सुनील खरात ६ हजार, जयश्री जाधव सहा हजार, किशोर राठोड ३४ हजार, आकाश पाल सात हजार रूपये. या सर्वांनी महावितरणच्या मु्ख्य सेवा वाहिनीवरून थेट वीज घेतली होती, असे तपासणीच्या पथकाच्या निदर्शनास आले. महावितरणचे टिटवाळा विभागाचे साहाय्यक अभियंता तुकाराम घोडविंदे व पथकाने ही कारवाई केली. घोडविंदे यांच्या तक्रारीवरून या वीज चोरी करणाऱ्या वीज चोरांविरुद्ध मुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.