कल्याण – टिटवाळा रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एक आणि दोन वर उतरण्यासाठी स्कायवाॅकच्या मधला आणि कल्याण दिशेकडे असलेले जिने विस्तारित कामासाठी तोडून टाकण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांना टिटवाळा रेल्वे स्थानकाच्या खडवली बाजुकडील एकमेव जिन्याने येजा करावी लागते. हा फेरा टाळण्यासाठी प्रवासी या फलाटांवरील उदवाहकासमोर रांगा लावून फलाटावरून स्कायवाॅकवर येजा करत आहेत.
नवखा प्रवासी टिटवाळा रेल्वे स्थानकात उतरल्यानंतर फलाट क्रमांक एक आणि दोनवर स्कायवाॅकवर जाण्यासाठी फलाटाचा मधला भाग आणि कल्याण दिशेने जाण्यासाठी जिना नसल्याने गोंधळून जात आहे. सकाळ, संध्याकाळच्या वेळेत या जिन्या अभावी प्रवाशांची कोंडी होत आहे. एका उदवाहनातून एकावेळी सुमारे १५ प्रवासी खाली वर प्रवास करतात. उदवाहकासमोर एकावेळी १०० प्रवासी रांगेत उभे राहतात. उदवाहक आले की आतील प्रवाशांची बाहेर पडण्यासाठी आणि बाहेर प्रवाशांची आत जाण्यासाठी धडपड सुरू होते. अनेक वेळा उदवाहकाची क्षमता संपली तरी प्रवासी उदवाहकामध्ये शिरण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे उदवाहकाचे दरवाजे बंद होत नाहीत. यावेळी प्रत्येक प्रवासी तु खाली उतर असे सांगत असल्याने वादाचे प्रसंग दररोज टिटवाळा रेल्वे स्थानकातील फलाटावर निर्माण होत आहेत.
फलाट क्रमांक एकवरून कसारा, आसनगावकडे जाणाऱ्या लोकल धावतात. फलाट क्रमांक दोन हा टिटवाळा लोकलसाठी आहे. टिटवाळा परिसराचे नागरीकरण झाले आहे. बहुतांशी नोकरदार वर्ग टिटवाळ्यात राहतो. सकाळच्या वेळेत तो टिटवाळा, कसारा, आसनगाव लोकलने मुंबई, नाशिककडचा प्रवास करतो. टिटवाळा रेल्वे स्थानकात आल्यानंतर अनेक प्रवासी घाईत असतात. ते आसनगावकडे जाणारी लोकल पकडण्यासाठी फलाटाच्या मध्य भागाच्या स्कायवाॅकवर येतात. त्यावेळी त्यांना मध्य भागातून फलाट क्रमांक एकवर उतरण्यासाठी जिना नाही. त्यांना उदवाहकाच्या रांगेत उभे राहावे लागते. रांग मोठी असल्याने उदवाहकामध्ये जाण्यासाठी लवकर क्रमांक लागत नाही. तेवढ्या वेळेत लोकल निघून जाते. त्यामुळे प्रवाशांचा संताप होत आहे.
मधल्या जिन्यावरून खडवली दिशेकडील जिन्यावर जाऊन तेथून पुन्हा फलाट क्रमांक एक, दोनवर उतरण्यासाठी प्रवाशांचा वेळ जातो. ही धावपळ लोकल समोर असताना करणे शक्य होत नाही, अशा प्रवाशांच्या तक्रारी आहेत. टिटवाळा लोकल स्थानकात आली, त्याचवेळी आसनगाव, कसाराकडे जाणारी लोकल स्थानकात आली की उदवाहकामध्ये शिरण्यासाठी प्रवाशांची झुंबड उडते.
काही आपत्कालीन परिस्थिती उदभवली तर मात्र कठीण प्रसंग टिटवाळा रेल्वे स्थानकात उदभवण्याची शक्यता अनेक प्रवासी व्यक्त करत आहेत.मधल्या जिन्यावरून फलाटावर उतरण्यासाठी उदवाहकाशिवाय अन्य पर्याय नाही. त्यामुळे प्रवाशांची गच्च भरलेले उदवाहक मध्येच अडकले. त्यात काही तांत्रिक बिघाड झाला तर मोठा प्रसंग उद्भवण्याची भीती प्रवासी व्यक्त करत आहेत. संध्याकाळी कामावरून परतलेले प्रवासी टिटवाळा रेल्वे स्थानकात मधल्या भागात जिना नसल्याने त्रस्त आहेत. अनेक प्रवासी विशेषता महिला प्रवासी खडवली दिशेकडील जिन्यावर जाऊन तेथून वळसा घेऊन मग रिक्षा वाहनतळावर येत आहेत. तोपर्यंत बराच वेळ जात असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत.
टिटवाळा रेल्वे स्थानकातील मधल्या स्कायवाॅकला जिना बांधणीची कामे लवकर पूर्ण करण्याची प्रवाशांची मागणी आहे.टिटवाळा रेल्वे स्थानकात रेल्वेकडून विस्तारिकरणाची कामे सुरू आहेत. ही कामे करण्यासाठी मधल्या भागातील स्कायवाॅकचे फलाट क्रमांक एक आणि दोनवर चढ उतरणारे जिने बंद करण्यात आले होते. काही तोडण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. ही कामे लवकर पूर्ण करावी यासाठी रेल्वे प्रशासनाकडे तगादा लावण्यात आला आहे.-शैलेश राऊत अध्यक्ष, कल्याण कसारा रेल्वे प्रवासी संघटना.
