कल्याण – टिटवाळा ते डोंबिवली माणकोली पूल दरम्यान उभारण्यात येत असलेल्या शहर बाह्य वर्तुळकार रस्त्याच्या कल्याणमधील दुर्गाडी किल्ला ते टिटवाळा दरम्यानच्या १५ किलोमीटरच्या रस्त्याच्या दोन्ही बाजुला सायकल मार्गिका आणि धावण्यासाठी (जाॅगिंग ट्रॅक) स्वतंत्र मार्गिका उभारण्याची मागणी शिवसेना (एकनाथ शिंदे) गटाचे कल्याणचे शहरप्रमुख रवी पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनाव्दारे केली आहे.
खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे, एमएमआरडीए आयुक्त, कल्याण डोंबिवली पालिका आयुक्त अभिनव गोयल, शहर अभियंता अनिता परदेशी यांनाही या निवेदनाच्या प्रती देण्यात आल्या आहेत. शहरप्रमुख रवी पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे, कल्याण पश्चिम हा नव्याने विकसित झालेला भाग आहे. नवीन कल्याण म्हणून हा परिसर भिवंडी, शहापूर तालुका हद्दीपर्यंत विकसित झाला आहे. अनेक गृहप्रकल्प या भागात उभारले गेले आहेत. नवीन वस्ती या भागात वाढली आहे. या नवीन वस्तीच्या भागातून टिटवाळा, कल्याण ते डोंबिवली शहरांदरम्यान जाणारा शहर बाह्य वर्तुळकार रस्ता गेला आहे. हा १०० फूट रुंदीचा प्रशस्त रस्ता प्रशस्त असल्याने परिसरातील नागरिक, ज्येष्ठ, वृध्द, तरूण पहाटे, संध्याकाळी, रात्रीच्या वेळेत या रस्त्यावर फिरण्यासाठी येतात. अनेक रहिवासी कल्याणमधील गांधारे भागातून टिटवाळा दिशेने पायी जातात. तेथून पुन्हा परतीचा पायी प्रवास करतात.
या रस्त्यावरून भरधाव वाहने विशेषता दुचाकी धावत असतात. अनेक दुचाकी स्वारांच्या निष्काळजीपणामुळे या रस्त्यावर यापूर्वी अपघात घडले आहेत. अनेक पादचाऱ्यांचे जीव गेले आहेत. येणाऱ्या काळात या रस्त्यावरील चालणाऱ्या नागरिकांची गर्दी वाढणार आहे. तसेच, दुर्गाडी किल्ला ते गोविंदवाडी, खंबाळपाडा, गणेशनगर, डोंबिवली माणकोली उड्डाण पूल हा टप्पा पूर्ण झाला तर या रस्त्यावरील वाहनांची वर्दळ वाढणार आहे. त्यामुळे या रस्त्यावरून फिरण्यासाठी चालणाऱ्या नागरिकांची वर्दळ वाढणार आहे. हा विचार करून या बाह्यवळण रस्त्याच्या एका बाजुला दुर्गाडी किल्ला ते टिटवाळा रस्ता दरम्यान चालण्यासाठी स्वतंत्र मार्गिका तयार करावी. यामुळे नागरिकांना या रस्त्याच्या बाजुने सहजपणे चालणे शक्य होईल आणि होणारे अपघात टाळण्यास मदत होणार आहे, असे शहरप्रमुख रवी पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.
सायकल ट्रॅक
तसेच, या रस्त्याच्या दुसऱ्या बाजुला दुर्गाडी किल्ला ते टिटवाळा दरम्यान १५ किलोमीटर अंतरात सायकल ट्रॅक बांधण्याची मागणी पाटील यांनी केली आहे. कल्याण, डोंबिवलीतील अनेक सायकल गट आहेत. हे गट विधायक हेतुने शहर परिसरात, दूरवरच्या सायकली सफरी काढून संदेश देण्याचे काम करतात. हे गट दररोज कल्याण, डोंबिवलीतील विविध रस्त्यांवरून सायकल चालवित असतात. टिटवाळा ते दुर्गाडी किल्ला भागात बाह्यवळण रस्त्यावरून अनेक सायकल स्वार दररोज रस्त्याच्या कडेने सायकल चालवित असतात. या सायकलपटुंसाठी दुर्गाडी किल्ला ते टिटवाळा दरम्यान वळण रस्त्याच्या बाजुला सायकल ट्रॅक बांधून दिला तर सायकल चालविणाऱ्या स्वारांची स्वतंत्र सोय या मार्गावर होणार आहे. त्यामुळे आपल्या या दोन मागण्यांचा प्राधान्याने विचार करावा, अशी मागणी शहरप्रमुख पाटील यांनी केली आहे.
