कल्याण -कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी किल्ला, लालचौकी परिसर रविवारी दुपारपासून वाहतूक कोंडीत अडकला. रुग्णवाहिका, अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना या कोंडीचा फटका बसला. वाहतूक पोलिसांचे योग्य नियोजन नसल्याने ही कोंडी झाल्याची टीका प्रवाशांनी केली.

कल्याण शहरात भिवंडी, पडघा गांधारी, शिळफाटा, अहिल्यानगर मुरबाडमार्गे वाहने शहरात येतात. आणि याच मार्गाने शहराबाहेर जातात. ही वाहने शहराबाहेर येण्याचे, जाण्याचे मार्ग मर्यादित आहेत. या रस्त्यांवर दररोज हजारो वाहने धावतात. ही वाहने योग्य नियोजन करून शहरात आणि शहराबाहेर पडली नाहीतर कल्याण शहर कोंडीत अडकते. रविवारी दुपारी वाहतूक विभागाच्या नियोजन शून्य कारभाराचा फटका प्रवाशांना बसला.

दुपारपासून दुर्गाडी किल्ला भागात वाहन कोंडीला सुरूवात झाली होती. ही कोंडी वाढत गेल्यामुळे लालचौकी, खडकपाडा, पडघा गांधारी मार्गे दुर्गाडी किल्ला, शिळफाटामार्गे दुर्गाडी किल्ला, शिवाजी चौकाकडे येणारी वाहने कोंडीत अडकत गेली. याच रस्त्यावरून उलटमार्गिकेतून जाणारी वाहने मग जागोजागी अडकून पडली. दुर्गाडी किल्ला भवानी चौकातील वाहन कोंडी सोडविण्यास विलंब झाल्याने या रस्त्याच्या परिसरातील गोविंदवाडी बाह्यवळण रस्ता, लालचौकी, खडकपाडा रस्ता वाहनांनी गजबजून गेले. भवानी चौकात एक वाहन पाच मिनिटाच्या वर एक सेकंद थांबले तरी दुर्गाडी किल्लाच्या चारही बाजुचे रस्ते क्षणात कोंडीत अडकतात, असे टिटवाळा येथील सामाजिक कार्यकर्ते विजय देशेकर यांनी सांगितले.

लालचौकी भागात एवढी अभूतपूर्व कोंडी झाली असताना रस्त्यावर एकही वाहतूक पोलीस दिसत नव्हता. काही जागरूक प्रवासी रस्त्यावर उतरूनवाहनांना रोखून इतर वाहनांना पुढे जाण्यासाठी आणि कोंडी सोडविण्यासाठी पुढाकार घेत होते. लालचौकी, दुर्गाडी किल्ला भागात सकाळी नऊ ते रात्री १० वाजेपर्यंत वाहतूक पोलीस कर्तव्यावर असतात. अशा परिस्थितीत दुर्गाडी किल्ला, लालचौकी भागात एवढी भीषण प्रमाणात वाहन कोंडी झाल्याबद्दल प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

लालचौकी, खडकपाडा, गोविंदवाडी भागात वाहन कोंडी झाल्यामुळे वाहन चालक कल्याण शहरातील अंतर्गत रस्त्यावरून प्रवास करून इच्छित स्थळी जाण्याचा प्रयत्न करू लागले. त्यामुळे शहरातील अंतर्गत रस्तेही कोंडीत अडकले. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने अनेक नागरिक ठाणे,नवी मुंबईतील व्यापारी संकुलातील खरेदीसाठी, आपल्या घरगुती उत्सवी कार्यक्रमाला वाहनाने निघाले होते. हे सर्व नागरिक कुटुंबीयांसह या कोंडीत अडकले. प्रवासी वाहतुकीची खासगी वाहने, मालवाहू अवजड वाहने, सार्वजनिक बस या कोंडीत अडकल्या होत्या. या कोंडीतून मोठ्या मुश्किलीने वाट काढत रुग्णवाहिकांना वाहन चालक रस्ता करून देत होते.

रविवार असल्यामुळे वाहनांची संख्या वाढते याची जाणीव असुनही वाहतूक पोलीस सुरूवातीला आपल्या कार्यालय, चौकीत सुशेगात असतात. एकदा वाहन कोंडी झाली की मग कोंडी सोडविण्यासाठी धावाधाव करतात. रविवारी तोच प्रकार लालचौकी भागात दिसून आला, असे सामाजिक कार्यकर्ते देशेकर यांनी सांगितले.