कल्याण – कल्याण पश्चिमेत आधारवाडी भागात कुटुंबीयांसह राहत असलेल्या एका २० वर्षाच्या प्रशिक्षणार्थी डाॅक्टर तरूणीच्या इन्स्टाग्रामवरील प्रतिमा, दृश्य ध्वनीचित्रफिती या तरूणीला कळून न देता स्वताच्या इन्स्टाग्रामवर स्थापित करून, या तरूणीची समाज माध्यमांत बदनामी करणाऱ्या एका अनोळखी इसमा विरूध्द या प्रशिक्षणार्थी डाॅक्टर तरूणीने बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी माहिती आणि तंत्रज्ञान कायद्याने गुन्हा दाखल करून घेतला आहे.

कल्याण पश्चिमेतील आधारवाडी भागात राहणारी ही तरूणी बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन आणि सर्जरी या पदवीचा अभ्यासक्रमाचा अभ्यास करते. नुकतीच तिने या पदवीसाठी परीक्षा दिली आहे. निकाल लागला नसल्याने ती घरीच असते. मागील पंधरा दिवसापूर्वी ही प्रशिक्षणार्थी डाॅक्टर तरूणी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित मिरवणुक कार्यक्रमात सहभागी झाली होती.

त्यावेळी तिच्या तोंडओळखीच्या असलेल्या एका तरूणीने प्रशिक्षणार्थी डाॅक्टर तरूणीला सांगितले, की तुझ्या इन्स्टाग्रामवरील प्रतिमा आणि दृश्यध्वनी चित्रफिती अन्य एका अनोळखी इसमाच्या इन्स्टाग्रामवर प्रसारित होत आहेत. मागील काही दिवसांपासून हा प्रकार आपण पाहत आहोत. हा प्रकार ऐकून प्रशिक्षणार्थी डाॅक्टर तरूणीला धक्का बसला.

आपल्या प्रतिमा समाज माध्यमांत कोण चोरून वापरत आहे. इतके दिवस आपणास काही का कळले नाही, असे प्रश्न या तरूणीच्या मनात निर्माण झाले. तिने घरी येऊन आपले इन्स्टाग्राम तपासले. त्यावेळी आपल्या प्रतिमा आणि दृश्यध्वनी चित्रफिती छेडछाड न करता आहे त्या स्थितीत तिला आढळले. अनोळखी इसम या तरूणीच्या समाज माध्यमांशी निगडित नव्हता. त्यामुळे या प्रशिक्षणार्थी डाॅक्टरला आपल्या प्रतिमा कोण वापरत आहे हे कळत नव्हते.

या तरूणीच्या मैत्रिणीने अनोळखी इसम इन्स्टाग्रामच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थी डाॅक्टरच्या ज्या प्रतिमा, दृश्यध्वनी चित्रफिती वापरतो त्याची समग्र माहिती दिली. ही माहिती पाहून तरूणीला धक्का बसला. आपल्या प्रतिमा आपल्या समाज माध्यमांतून चोरून घेऊन त्या अन्य ठिकाणी स्थापित करून आपली बदनामी करण्याचा हा डाव असल्याचे या प्रशिक्षणार्थी डाॅक्टरच्या निदर्शनास आले.

तिने या सर्व प्रकरणाची तांत्रिक माहिती करून घेतली. आपल्या कुटुंबीयांना या सर्व प्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर या तरूणीने बाजारपेठ पोलीस ठाण्यात जाऊन इन्स्टाग्रामवरील आपल्या प्रतिमा चोरून वापरून आपली समाज माध्यमांत बदनामी करण्याचा प्रयत्न केल्या बद्दल अनोळखी इसमाविरूध्द तक्रार केली. पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्याने याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.