कल्याण – कल्याण पश्चिमेतील बिर्ला स्कूल समोरील टायकुन्स गोल्ड एव्हेन्यू पुनर्विकास प्रकल्पात आपल्यासह शांतीदूत सहकारी गृहनिर्माण संस्थेचे सदस्य यांची एकूण १७६ कोटी रूपयांहून अधिक रकमेची विकासकांनी फसवणूक केली आहे, अशी तक्रार या गृहप्रकल्पात फसवणूक झालेल्या खडकपाडा येथील रहिवासी नंदा प्रभाकर म्हात्रे यांनी मंगळवारी खडकपाडा पोलीस ठाण्यात केली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी टायकुन्स गोल्ड ऐव्हन्यू प्रकल्पाचे विकासक श्रीकांत दिगंबर शितोळे, चेतन सराफ, महेश गोसावी यांच्यासह इतरांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३(५), ३१६(२) आणि ३१८(४) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गृहप्रकल्पाचे काम मागील सहा वर्षापासून बंद आहे. सोसायटीची जमीन गहाण ठेवून सदनिकाधारकांची फसवणूक विकासकांनी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
पुनर्विकासाचे आश्वासन खडकपाडा पोलीस ठाण्यात नंदा म्हात्रे यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यातील माहिती अशी, की कल्याण पश्चिमेतील चिकनघर येथील सर्व्हे क्रमांक २२ मधील म्हाडाच्या मध्यम उत्पन्न योजनेतील (एमआयजी) शांतीदूत सहकारी गृहनिर्माण संस्था लिमिटेडच्या पुनर्विकासाचे काम टायकुन्स अवंती प्रोजेक्ट्स एलएलपीकडे देण्यात आले होते. टायकुन्स रियल्टीज एलएलपी आणि सिकॉम रियल्टी लिमिटेड यांचा हा संयुक्त उपक्रम असल्याचे तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी नंदा प्रभाकर म्हात्रे यांनी २९ ऑगस्ट २०२१ रोजी प्रकल्पातील ‘ए’ विंगमधील अकराव्या माळ्यावरील सदनिका क्रमांक ११०१ खरेदीसाठी ३९ लाख ३६ हजार ६९ रूपये विकासक कंपनीत भरल्याचे नमूद केले आहे. जुलै २०२५पर्यंत सदनिकेचा ताबा देणे अपेक्षित असतानाही तो विकासकांकडून देण्यात आला नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. विकासकांनी प्रकल्पाचे बांधकाम केवळ दहाव्या मजल्यापर्यंत केले आहे. त्यानंतरचे काम अर्धवट राहिल्याचे फिर्यादीचे म्हणणे आहे. २०२२ पासून प्रकल्पाचे काम पूर्णपणे बंद असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यामुळे मूळ रहिवाशांसह नव्या सदनिका खरेदीदारांपुढे घराचा ताबा मिळण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, असे तक्रारीत आहे.
सोसायटीची जमीन गहाण
सोसायटी सदस्यांनी विकासकांना देण्यात आलेल्या कुलमुखत्यारपत्राचा गैरवापर करून सोसायटीची जमीन बँकेकडे गहाण ठेवण्यात आली. या व्यवहारामुळे सोसायटीचे रहिवासी आणि सदनिका खरेदीदार आर्थिक अडचणीत सापडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. आहे. शांतीदूत सहकारी गृहनिर्माण संस्थेतील १८४ सदस्य आणि इतर घर खरेदीदारांकडून मिळून विकासकांनी १७६ कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. घराचा ताबा, पुनर्विकास आणि आर्थिक व्यवहार याबाबत दिलेली आश्वासने विकासकांनी पूर्ण न केल्याचा दावा फिर्यादीकडून करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक प्रेमनाथ शेटे ढोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. टायकुन्स कंपनीने आरोप फेटाळले म्हाडा पुनर्विकास टायकुन्स स्क्वेर प्रकल्पातील एक ग्राहकाच्या तक्रारी वरून गुन्हा दाखल झाला आहे, याबाबत टायकुन्स समूह सर्व आरोप फेटाळून लावत आहे. तक्रारदार यांनी प्रकल्पात रहिवासी सदनिका खरेदीचा ४० लाखांचा व्यवहार केला असून १७६ कोटीच्या घोटाळ्याचा दावा पूर्णपणे खोटा व चुकीचा आहे आहे, असे टायकुन्स कंपनीने खुलाशात म्हटले आहे. चिकनघर म्हाडा मधील सर्वच प्रकल्पांना धोरणात्मक त्रुटींमुळे प्रचंड विलंब झालेला आहे व त्यामुळें टायकुन्स समूहाला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्यामुळे, ग्राहकांना घरांचा ताबा देण्यास विलंब झाला आहे. प्रकल्प रेरा प्राधिकरणाकडे नोंदणीकृत आहे. याबाबत ग्राहकांना रेरा प्राधिकरणाकडे दाद मागणे आवश्यक आहे .
कल्याणमधील काही स्वार्थी स्थानिक विरोधक व स्थानिक नेते यांनी या अडचणींचा गैर फायदा घेऊन विकासक यांचे विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी काही स्थानिक राजकीय, काही हस्तक यांना टायकुन्स समूहाला त्रास देऊन प्रकल्प बळकावण्याचा कटकारस्थान रचलेले आहे. प्रकल्पाला केंद्र सरकारकडील निधीच्या वित्त पुरवठ्याची अंतिम मंजुरी प्राप्त असताना एका संस्थेतील काही लोकांना व ग्राहकांना हाताशी धरून विरोध करून, गुन्हा दाखल करून अडचणी निर्माण करून श्रीकांत शितोळे यांचेवर दबाव निर्माण करून वाटाघाटी करण्याचे व प्रकल्प बळकावण्याचा षडयंत्र रचत आहेत.
या विषयी टायकुन्स समूहाकडे सबळ पुरावे उपलब्ध आहेत, असे समुहाने खुलाशात म्हटले आहे. टायकून्स समूह याविषयी पालीस प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करणार आहे. टायकून्स समूह सर्व सदनिकाधारकांना व ग्राहकांना विश्वास देत आहे कि, अशा कोणत्याही चुकीच्या विषयांमुळे प्रकल्पाला बाधा निर्माण होणार नाही याबाबत प्रयत्नशील आहे.
