कल्याण: दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसधार पावसामुळे मोहने येथील उल्हास नदी पात्राजवळील भूमिगत जलवाहिनी पाण्याच्या अतिदाबामुळे तुटली. या जलवाहिनीतून बारावे येथील जलशुध्दीकरण केंद्राला होणारा पाणीपुरवठा सोमवारी संध्याकाळपासून बंद झाला आहे. या तुटलेल्या जलवाहिनीचे दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यासाठी ४८ तास लागणार असल्याने या कालावधीत कल्याण पूर्व, पश्चिम भागाला पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

मंगळवारी पालिकेचा नेहमीचा पाणी पुरवठा बंद. त्यात जलवाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी ४८ तास लागणार आहेत. त्यामुळे कल्याण पूर्व, पश्चिम भागाला दोन दिवस पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

आधी गाळ जमा

उल्हास नदीत उल्हास खोऱ्यातून मुसळधार पावसामुळे अधिक प्रमाणात पालापाचोळा, झाडांची ओंडकी, गाळ वाहून आला आहे. हा गाळ मोहने येथील उदंचन केंद्रात अडकल्याने या ठिकाणी पाणी उपसा करणारी यंत्रणा बंद पडली. विविध प्रकारचे दुरुस्तीचे प्रयत्न करूनही हे पंप, यंत्र सुरू होत नव्हती. पंपातून पुरेशा दाबाने नदीतून पाणी उचलले जात नव्हते. हा गाळ, पालापाचोळा दूर करण्यासाठी पालिका पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी, ठेकेदार यंत्रणा काम करत होती.

यावेळी मोहने उदंचन केंद्रातून बारावे येथील जलशुध्दीकरण केंद्रात जाणारी भूमिगत वाहिका पाणी वाहून नेत नसल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. गाळामुळे हा प्रकार घडला का हे तपासल्यानंतर या वाहिकेत गाळ अडकला नव्हता. त्यानंतर भूमिगत वाहिकेचा काही भाग तपासल्यानंतर वाहिका मोहने येथील स्टेम जलवाहिन्याच्या खाली तुटली असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.

ही तुटलेली वाहिका बाजुला करून मग तेथे नवीन वाहिका बसविण्याचे काम केल्यानंतरच या जलवाहिनीचा पाणी पुरवठा सुरू होणार आहे. मुसळधार पावसात हे काम करावे लागणार आहे. त्यामुळे या कामाला किमान ४८ तास लागणार आहेत. पालिकेने या तुटलेल्या जलवाहिनीविषयी नागरिकांना सोमवारी सकाळी माहिती दिली. पुढील ४८ तास कल्याण पू्र्व, पश्चिम भागाला पाणी पुरवठा होणार नसल्याचे कळविले.

युध्दपातळीवर काम

मुसळधार पाऊस आणि त्यात उल्हास नदीच्या पाण्याची पातळी वाढत आहे. जोपर्यंत काही अंशापर्यंत पाण्यात बुडालेले पंप स्पष्टपणे दिसत नाहीत तोपर्यंत ते बंद करणे आणि या पंपांना जोडलेल्या वाहिकेवर काम करणे शक्य होत नाही. या वाहिकेतून जलशुध्दीकरण केंद्राकडे जाणाऱ्या वाहिकेतील गतिमान पाण्याचा प्रवाह एकदा कमी केला, की मग तांत्रिक कामगारांना हे काम गतीने पूर्ण करणे शक्य होणार आहे. या वाहिकेची दुरुस्ती करताना स्टेम योजनेच्या जलवाहिनीखाली खोदकाम करावे लागणार आहे. या ठिकाणीही अवघडल्या परिस्थितीत दुरुस्ती यंत्रणेला काम करावे लागणार आहे, असे एका माहितगाराने सांगितले.

कल्याण शहराचा पाणी पुरवठा ४८ तास बंद ठेवावा लागणार असल्याने नागरिक, नगरसेवकांकडून पाणी टंचाईच्या विषयावर ओरड होण्याची शक्यता विचारात घेऊन मंगळवारी सकाळी महापौर ॲड. हर्षाली चौधरी, शहर अभियंता अनिता परदेशी, कार्यकारी अभियंता शैलेश मळेकर, शैलेंद्र कुलकर्णी, महेश डावरे यांनी घटनास्थळी भेट दिली. दुरुस्तीचे काम लवकर होईल यादृष्टीने हालचाली केल्या. महापौरांनी दुरुस्तीचे काम विनाअडथळा तातडीने वेळेच्या आधी पू्र्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या. मुसळधार पाऊस सुरू असल्याने हे काम करताना अनेक अडथळे येत आहेत.