कल्याण : कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील कचऱ्याचे शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे निर्देष हरित लवादाने दिले आहेत. लवादाच्या अटी-शर्तींवर कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील बारावे, उंबर्डे येथील घनकचरा प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पांमधील कचरा विल्हेवाटीची प्रक्रिया हरित लवादाच्या निर्देशाप्रमाणे होत नाही, अशी तक्रार माजी नगरसेवक सुधीर बासरे यांनी आयुक्त अभिनव गोयल यांच्याकडे केली आहे.
पालिका प्रशासनाने पालिका हद्दीतील कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी कल्याण पश्चिमेतील मौजे उंबर्डे व मौजे बारावे या ठिकाणी घनकचरा प्रकल्प उभारले आहेत. या प्रकल्पांमध्ये शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लागली पाहिजे. पर्यावरण संवर्धनाच्या सर्व नियमांचे पालन झाले पाहिजे, अशा अटी-शर्ती लवादाने हे प्रकल्प सुरू करताना निश्चित केल्या आहेत, असे बासरे यांनी म्हटले आहे.
उंबर्डे, बारावे येथील प्रकल्पाची पाहणी केल्यावर तेथे अनेक त्रृटी दिसल्या. मागील काही दिवसांपूर्वी एका आमदाराने या प्रकल्पाला भेट दिल्यावर या प्रकल्पातील अनेक त्रृटी उघड झाल्या होत्या. अधिकारी हे प्रकल्प शास्त्रोक्त पद्धतीने चालविले जात असल्याचे सांगत असले तरी प्रत्यक्षात या प्रकल्पांमध्ये अनेक त्रृटी आहेत. हा प्रकल्प शास्त्रोक्त पद्धतीने चालविणार आहोत, असाही घनकचरा अधिकारी वर्गाचा सूर आहे. त्यामुळे घनकचरा प्रकल्प पर्यावरण संवर्धन, शास्त्रोक्त विल्हेवाटीचा विचार न करता चालविले जात आहेत, असे माजी नगरसेवक सुधीर बासरे यांनी सांगितले.
मागील अनेक वर्षे घनकचरा विभाग दिशाभूल करून करदात्या नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचे काम करीत आहे. हरित लवादाच्या नियमांचे उल्लंघन या प्रकल्पात होत असल्याने यासंदर्भात लवकरच हरित लवादाकडे तक्रार करण्यात येणार आहे, असे बासरे यांनी सांगितले. प्रशासन दरवर्षी कचरा संकलनासाठी हजार कोटीचा खर्च करते. कचऱ्याचे शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन होत नसेल तर मग एवढा हजार कोटीचा खर्च जातो कुठे, असा प्रश्न सुधीर बासरे यांनी केला आहे.
कल्याण-डोंबिवली शहरांना कचऱ्यामुळे बकालपण आले आहे. करदात्या नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या भ्रष्ट ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी बासरे यांनी आयुक्तांकडे केली आहे. घनकचरा विभागात अनेक कामगार, वाहने बाह्यस्रोत यंत्रणेकडून घेण्यात आले आहेत. त्यांच्यावर पालिका कोट्यवधीचा खर्च करते. काही अधिकाऱ्यांचीही वाहने घनकचरा विभागात त्रयस्थ नावाने सक्रिय असल्याची चर्चा आहे. त्याचाही आयुक्तांनी शोध घ्यावा, असे बासरे यांनी सांगितले.
घनकचरा प्रकल्पांतील कचऱ्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जात आहे. शून्य कचरा मोहीम यशस्वीतेकडे जात आहे. ज्या भागातून कचऱ्याच्या तक्रारी येत आहेत. त्याची दखल घेतली जात आहे. बारावे, उंबर्डे येथील कचरा विल्हेवाटीची प्रक्रिया शास्त्रोक्त पद्धतीने केली जात आहे. अत्याधुनिक यंत्रणा येथे सक्रिय आहे.– डाॅ. रामदास कोकरे उपायुक्त, घनकचरा विभाग, कडोंमपा.
