कल्याण – शहर विकासात भर घालणारा आणि कल्याण ते उल्हासनगर, कल्याण पूर्व , विठ्ठलवाडी भागाची वाहतूक कोंडीतून मुक्तता करणाऱ्या वालधुनी (प्रेम ऑटो) ते विठ्ठलवाडी दरम्यानच्या २४ मीटर रूंदीच्या चार पदरी पुलाच्या उभारणीत अडथळा येणारी बुध्दभुमी फाऊंडेशनची अतिक्रमणे नोटीस देऊन पालिकेने कारवाई करून काढली आहेत. फाऊंडेशनला सर्वोतपरी सहकार्य करण्याची भूमिका पालिका प्रशासनाने नेहमीच ठेवली आहे. फाऊंडेशनच्या अतिक्रमणांवर प्रशासनाने कोणत्याही आकसबुध्दीने कारवाई केलेली नाही, असे कल्याण डोंबिवली पालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी सांगितले.

कल्याण ते उल्हासनगर, कल्याण पूर्व, विठ्ठलवाडी, शहाड परिसरातील प्रवाशांची वाहन कोंडीतून कायमची मुक्तता करण्यासाठी ‘एमएमआरडीए’ने पालिका प्रशासनाच्या सहकार्याने कल्याण पश्चिमेतील मुरबाड रस्त्यावरील वालधुनी (प्रेमऑटो) ते विठ्ठलवाडी दरम्यान २४ मीटर रूंदीचा पूल उभारणीचे काम सुरू केले आहे. शहर विकासातील हा महत्वाचा उड्डाण पूल प्रकल्प आहे, असे आयुक्त गोयल यांनी सांगितले.

टीडीआर देऊन जागेचा ताबा

वालधुनी ते विठ्ठलवाडी दरम्यान जाणाऱ्या उड्डाण पुलाच्या परिसरातील ६० हजार चौरस मीटरची जागा ही पालिकेने विकास हक्क हस्तांतरण देऊन (टीडीआर) ताब्यात घेतली आहे. या जागेचा सात बारा उतारा कल्याण डोंबिवली पालिकेच्या नावावर आहे. या क्षेत्रावरील ११ हजार ६३८ चौरस मीटरची जागा ही महामार्गासाठी राखीव असलेल्या उड्डाण पूल क्षेत्रासाठी अधिसूचित करण्यात आली आहे. या क्षेत्रावर उड्डाण पूल उभारणीचे काम सुरू झाल्यानंतर अनेक वेळा पालिका अधिकाऱ्यांनी या क्षेत्रावरील बुध्दीभुमी फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. फाऊंडेशनाला नोटिसा देऊन त्यांची अतिक्रमणे स्वताहून काढण्यासाठी नोटीस दिली. ती नोटीस फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी स्वीकारली नाही. पोलीस बंदोबस्तात पुलाच्या मार्गात अडथळा येणाऱ्या फाऊंडेशनच्या नियंत्रणाखालील चार बुध्द मूर्ती काढून त्या फाऊंडेशन पदाधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आल्या, असे आयुक्तांनी सांगितले.

फाऊंडेशनला सहकार्य

बुध्दभुमी फाऊंडेशच्या काही मागण्या आहेत. त्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी पालिका प्रशासन सकारात्मक आहे. उड्डाण पुलाचे काम करताना फाऊंडेशनवर अन्याय होणार नाही याची काळजी प्रशासन घेत आहे. शहर विकास आणि वाहतुकीचा भविष्यकालीन विचार करून हा पूल महत्वाचा असल्याने हे काम गतीने केले जात आहे, असे आयुक्तांनी सांगितले.

फाऊंडेशनची नाराजी

पालिकेने कोणतीही पूर्वसूचना न देता फाऊंडेशनच्या जागेत कारवाई केली. यावेळी काही मूर्ती, स्तुपाची मोडतोड झाली. यामुळे बौध्द समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. ही कारवाई करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांविरूध्द कायदेशीर कारवाई करण्याची मागणी फाऊंडेशनने केली आहे. भन्ते गौतम रत्न यांनी प्रशासनावर आरोप करत या कारवाईने धार्मिक स्थळावर अन्याय झाल्याचा दावा केला आहे. पालिका आयुक्त, एमएमआरडीए अधिकारी, टीएनटी इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची फाऊंडेशनची मागणी आहे. बौध्द समाजाने या कारवाईबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.