कल्याण – कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक ते लालचौकी भागात रिक्षा प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांनी मनमानी करून सोमवारी १७ रूपयांवरून तीन रूपयांची भाडे वाढ करून प्रवाशांकडून २० रूपये भाडे उकळण्यास सुरूवात केल्याने या मार्गाने नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. लालचौकीकडे जाणाऱ्या रिक्षा चालकांच्या प्रवासी वाहतुकीबाबत नेहमीच तक्रारी असतात. आता भाडेवाढीतून हा रिक्षा वाहनतळ पुन्हा चर्चेत आला आहे.
मागील काही महिन्यापूर्वी कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक ते लालचौकी रिक्षा प्रवासी भाडे १५ रूपये होते. हे भाडे या भागातील रिक्षा चालकांनी काही दिवसांनी मनमानी करून १७ रूपये केले. ही भाडे वाढ तुम्ही उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या सूचनेवरून करता की मनमानीने करतात .याविषयी हे रिक्षा चालक आम्हाला शासन आदेश येतो त्याप्रमाणे आम्ही भाडेवाढ करतो, अशी बेलगाम उत्तरे प्रवाशांना देऊन प्रवाशांकडून वाढीव भाडे उकळतात.
याच रिक्षा वाहतळांवरील रिक्षा चालकांवर यापूर्वी वाहतूक विभाग, आरटीओने प्रवाशांनी उर्मटपणे वागणे, वाढीव भाडे आकारणी विषयावरून कारवाई केली होती.
तीन रूपये भाडेवाढ
कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक ते लाल चौकीकडे जाणाऱ्या प्रवाशांकडून रिक्षा चालकांनी १७ रूपयांऐवजी २० रूपये उकळण्यास सुरूवात केली आहे. दर तीन ते चार महिन्यांनी तुमची भाडेवाढ कशी होत राहते. शासन तर असा कोणताही आदेश काढत नाही, असे प्रवाशांनी सुनावल्यावर रिक्षा चालक उलटसुलट उत्तरे देऊन गप्प राहणे पसंत करतात. सोमवारपासून रिक्षा चालकांनी लालचौकी ते कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भाडे २० रूपये आकारण्यास सुरूवात केली आहे. हे भाडे आम्हाला वरून आदेश आला की करतो. त्याप्रमाणे ही भाडे वाढ आम्ही केली आहे, अशी उत्तरे सोमवारपासून लालचौकी रिक्षा वाहनतळावरील रिक्षा चालक प्रवाशांना देत आहेत. विशेष म्हणजे कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील रिक्षा वाहनतळाच्या फलकावर लालचौकी भाडे २० रूपये लिहिण्यात आले आहे. हे भाडे वाढ आरटीओच्या परवानगीने की रिक्षा चालकांनी मनमानीने लिहिले आहे याविषयी प्रवासी संभ्रमात आहेत. कल्याण ते सिंधीगेट पर्यंतचे भाडे रिक्षा चालक मनमानी करून आकारत होते. याविषयी सामाजिक कार्यकर्ते योगेश दळवी यांनी आवाज उठविला होता. त्यानंतर या मार्गावरील भाडे आरटीओच्या कारवाईने कमी झाले होते.
कल्याण रेल्वे स्थानक ते लालचौकी दरम्यान प्रवासी वाहतूक करणारे रिक्षा चालक प्रवाशांकडून २० रूपये भाडे आकारत आहेत. या मार्गावर प्रवाशांकडून आकारण्यात येणारे वाढीव भाडे नियमबाह्य आहे. याप्रकरणी प्रवाशांच्या तक्रारी येत आहेत. संबंधित रिक्षा चालकांवर वाढीव भाडे आकारल्याप्रकरणी कारवाई सुरू करण्यात येणार आहे. वाढीव भाडे आकारणाऱ्या रिक्षा चालकाचा वाहन क्रमांक प्रवाशांनी आरटीओच्या संकेतस्थळावर पाठवावा.- आशुतोष बारकुल उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, कल्याण.
उपप्रादेशिक परिवहन विभागाने ठरवून दिलेल्या भाड्याप्रमाणे रिक्षा चालकांनी प्रवाशांकडून भाडे घ्यावे. वाढीव भाडे घेणाऱ्या रिक्षा चालकाची प्रवाशांनी आरटीओ विभागाकडे तक्रार करावी. आता कोणत्याही प्रकारची भाडेवाढ झालेली नाही. जे कोणी अशी वाढीव भाडे आकारण्यासाठी आग्रही असतील त्यांच्यावर आरटीओने कारवाई करावी. – सुरेश नवले पदाधिकारी, रिक्षा संघटना, कल्याण.

