कल्याण – कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागातील सॅटिस पुलाच्या भागातील एका टप्प्यातील उड्डाण पुलाचा मार्ग मार्च अखेरपर्यंत सुरू करण्यात येणार होता. यामध्ये काही तांत्रिक अडथळे आले. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हे काम अडथळे पार करून पूर्ण करायचे, असा विचार करून कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या पुलाच्या मार्गातील अडथळे दूर करून लवकरच कल्याण पश्चिम सॅटिस मार्गातील नेताजी सुभाषचंद्र बोस ते बैलबाजार चौक दरम्यानचा उड्डाण पुलाचा टप्पा लवकर खुला करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.
स्मार्ट कल्याण डोंबिवली डेव्हलपमेंट कॉर्पोरशन लिमिटेड अंतर्गत सुरू असलेल्या ”कल्याण पश्चिम रेल्वे स्टेशन परिसर सुधारणा’ प्रकल्पाने आता आधुनिकतेच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल टाकले आहे. या प्रकल्पातील नियोजित उड्डाण पूल- ए भाग- नेताजी सुभाषचंद्र बोस चौक ते बैलबाजार चौक़ापर्यंत आहे. या पुलाची लांबी १ हजार १२५ मीटर आणि रुंदी सरासरी १८ ते ९ मीटर आहे. या उड्डाणपुलाचे काम आता अंतिम टप्यात आहे.
अंतीम टप्पा
या उड्डाण पुलाच्या अवघडल्या भागाच्या दोन ठिकाणी बांधकामासाठी मलेशिया देशाच्या ”अल्ट्रा-हाय परफॉर्मन्स फायबर रीइन्फोर्ड फोर्ड काँक्रीट (UHPFRC) या जागतिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या कामाला आयआयटी, मुंबई यांनी संरचनात्मक संकल्प चित्र करून दिले. या तंत्रज्ञान, संकल्पचित्राच्या आधारे हे काम करणे आता सोपे झाले आहे. त्यामुळे या पुलाचा पहिला टप्पा मोकळा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
कल्याण स्टेशन परिसरातील पंडित जवाहरलाल नेहरू चौक ( प्रवेशद्वार क्र. १) येथे सध्या अस्तित्वात असलेला पादचारी पुल या उड्डाणपुलाच्या कामामुळे तोडावा लागणार होता. कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असल्याने सदर पादचारी पूल निष्कासित करणे योग्य नव्हते. त्यामुळे कल्याण स्टेशन समोरील परिसरात मलेशिया अत्याधुनिक तंत्राचा वापर करून करून सोमवारी मध्यरात्री गर्डर ठेवण्याचे काम करण्यात आले.
यावेळी कल्याण डोंबिवली पालिकेच्या महापौर हर्षाली चौधरी, आयुक्त अभिनव गोयल ,शहर अभियंता अनिता परदेशी, या प्रकल्पाचा कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे, तसेच प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार कंत्राटदार उपस्थित होते. या महिनाअखेर कार्यकारी अभियंता लोकरे सेवानिवृत्त होत आहेत. या पुलाचा एक टप्पा तरी आपल्या सेवाकाळात प्रवासी वाहतुकीसाठी सुरू व्हावा यासाठी त्या प्रयत्नशील आहेत.
कोंडी सुटणार
कल्याण डोंबिवली पलिकेने मलेशिय अत्याधुनिक जागतिक तंत्रज्ञानाचा प्रथमच वापर केला आहे. कल्याण पश्चिम रेल्वे स्टेशन परिसरातील कोंडी सोडवण्यासाठी हा प्रकल्प महत्वाचा प्रकल्प ठरणार आहे. हे अत्याधुनिक तंत्रज्ञान पारंपारिक काँक्रीटपेक्षा कित्येक पटीने अधिक मजबुत आणि लवचिक असते. हे सिमेंट, सिलिका फ्युम, विशेष प्रकारचे स्टील फायबर्स आणि रसायनांचे मिश्रण करून तयार केले जाते, हे तंत्रज्ञान काँक्रीटला स्टीलसारखी मजबुती प्रदान करते. याची संकुचन शक्ती साध्या काँक्रीटपेक्षा ५ ते ६ पटीने अधिक असते. हे काँक्रीट अत्यंत दाट असल्याने हवामानाचा किंवा प्रदूषणाचा यावर परिणाम होत नाही, पुलाचे आयुष्य १०० वषपिक्षा जास्त वाढते. हे तंत्रज्ञान वापरल्यामुळे पुलाचे स्ट्रक्चर हलके परंतु अत्यंत भक्कम होते, ज्यामुळे भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तींमध्ये अधिक सुरक्षा मिळते. त्याला तडे जाण्याचे प्रमाण नगण्य असल्याने भविष्यातील दुरुस्तीचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाचतो, असे लोकरे यांनी सांगितले. या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये भर पडणार आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस ”मिसिंग लिंक प्रकल्पात मलेशिय अत्याधुनिक तंत्राचा वापर करण्यात आला आहे.
