कल्याण – ‘आमच्याकडे रोखून का बघतोस,’ असा प्रश्न करत कल्याण पश्चिमेतील बैलबाजार भागात बुधवारी एका विद्यार्थ्यावर स्थानिक दोन तरूणांनी धारदार चाकुने हल्ला करून विद्यार्थ्याला जखमी केले. या हल्ल्यात विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्लेखोर तरूणांची स्थानिक पातळीवर दहशत असल्याच्या तक्रारी रहिवाशांनी केल्या. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांनी तक्रार केली आहे.
फरदीन शेख असे जखमी विद्यार्थ्याचे नाव आहे. हल्लेखोर दोन तरूणांमधील एक जण अल्पवयीन आहे. मिळालेली माहिती अशी, कल्याण पश्चिमेतील बैलबाजार मासळी बाजार भागात फरदीन शेख आपल्या कुटुंबासह राहतो. बुधवारी तो आपल्या दुचाकीवर आपल्या लहान बहिणींना शाळेत सोडण्यासाठी गेला होता. बहिणींना शाळेत सोडून तो दुचाकीवरून घरी येत होता. त्यावेळी वाटेत त्याची दुचाकी त्याच्या परिचित दोन तरूणांनी अडवली. आणि ‘काय रे तू आमच्याकडे रोखून का बघतोस,’ असा प्रश्न केला. फरदीन याने आपण असे काही करत नाही, असे तरूणांना सांगितले. तू आमच्याकडे नेहमी रोखून बघतोस. आता तू आमच्याशी खोटे बोलत आहेस, असे बोलत दोन्ही तरूणांनी शिवीगाळ करत फरदीनला मारहाण केली.
या दोन्ही मित्रांच्या तावडीतून सुटून फरदीन घरी आला. त्याने दुचाकी घरी ठेवली. तो आपल्या एका मित्रासोबत मारहाण करणाऱ्या तरूणाच्या घरी गेला. तेथे त्याला ‘तू मला माझी काही चुकी नसताना का मारहाण केली,’ असे प्रश्न केले. आपल्या घरी येऊन आपणास फरदीन जाब विचारतो याचा राग तरूणाला आला. त्याने जवळील चाकूने फरदीनवर हल्ला केला. या हल्ल्यात फरदीन गंभीर जखमी झाला. हल्लेखोराच्या दुसऱ्या भावानेही फरदीनला मारहाण केली.
या दोन्ही तरूणांची स्थानिक पातळीवर दहशत आहे. काही दिवसांपूर्वी या तरूणांनी एका महिलेच्या घरात घुसून गोंधळ घातला होता, असे स्थानिकांनी सांगितले. या तरूणांच्या वाढत्या उपद्रवमुल्याने स्थानिक रहिवासी अस्वस्थ आहेत. बाजारपेठ पोलीस ठाण्यात याप्रकरणी फरदीनच्या कुटुंबीयांनी तक्रार केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. फरदीनच्या कुटुंबीयांनी या दोन्ही हल्लेखोर तरूणांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून शाळकरी मुलांमध्ये क्रिकेट खेळणे, मैत्रिणींच्या विषयांवरून भांडणे होण्याचे प्रमाण वाढत आहे. गेल्या वर्षी ठाकुर्ली खंबाळपाडा भागात एका महाविद्यालयाच्या बाहेर एका तरूणाला महाविद्यालयातील काही तरूणांनी किरकोळ कारणावरून बेदम मारहाण केली होती.

