कल्याण : कल्याण पश्चिमेत गोवंडी मोहल्ला भागात राहत असलेल्या कुटुंंबातील पत्नीने कौटुंबिक वादातून पतीच्या चेहऱ्यावर उकळते तेल फेकल्याने पती गंभीर जखमी झाला आहे. उकळत्या तेलाचे चटके हात, चेहरा, डोळ्यांना बसल्याने पतीचे सर्वांग भाजून गेले आहे. या पतीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बुधवारी मध्यरात्री हा प्रकार घडला आहे. दिवा इमरान अब्दुल गफार शेख असे गुन्हा दाखल पत्नीचे नाव आहे.
इमरान अब्दुल गफार शेख (४८) असे तक्रारदार पतीचे नाव आहे. हे कुटुंब बैलबाजार भागातील मेमन मस्जिद जवळ, गोवंडी मोहल्ला भागातील उस्मान गेजरे चाळीत राहे. बाजारपेठ पोलीस ठाण्यात इमरान शेख यांनी याप्रकरणी तक्रार केली आहे. इमरान हे रिक्षा चालक आहेत. प्रवासी वाहतुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून त्यांचे कुटुंब चालते. दिवा ही गृहिणी आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल महिलेला अटक करण्यात आलेली नाही, असे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी सांगितले, इमरान आणि दिवा शेख हे पती पत्नी आहेत. त्यांच्यात कौटुंबिद वाद यापूर्वी होत होते. बुधवारी मध्यरात्री अडीच वाजताच्या दरम्यान इमरान आणि पत्नी दिवा शेख यांच्यात कौटुंबिक कारणावरून वाद सुरू झाला. दोघांमधील वाद वाढत गेला. वाद सुरू असतानाच संतप्त झालेल्या पत्नी दिवाने तेल गरम केले. गरम केलेले तेल ती अन्य काही कारणासाठी वापरणार असेल असे इमरानला वाटले. हे गरम केलेले तेल पत्नी पती इमरान याला काही कळण्याच्या आत त्यांच्या डोक्यावर, डोळ्यावर, चेहऱ्यावर, हातावर ओतले. गरम चटके अंगावर पडल्याने इमरानने ओरडा केला. त्यावेळी त्यांच्या चाळीतील शेजारी जागे झाले.
गरम तेलाने इमरानची त्वचा भाजून निघाली. चेहरा, डोळ्याला दुखापत झाल्याने त्याला सुरूवातीला काही कळेनासे झाले. तशा परिस्थितीत इमरान शेखने आपल्या समर्थकांच्या मदतीने बाजारपेठ पोलीस ठाणे गाठले. तेथे घडलेल्या घटनेची माहिती दिली. इमरानच्या शरीराचा दाह सुरू झाल्याने तो अस्वस्थ होता. पोलिसांच्या सूचनेवरून इमरानने पालिका रुग्णालयातून घडलेल्या प्रकाराचा वैद्यकीय अहवाल आणला. त्याप्रमाणे पोलिसांनी इमरानची पत्नी दिवा शेख यांच्या विरुध्द भारतीय न्याय संहितेच्या कलम १२१ (१) प्रमाणे गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेशसिंग गौड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किशोर कुवर याप्रकरणाचा तपास करत आहेत.