कल्याण : रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण आणि सुभेदार वाडा कट्टा यांच्यावतीने रानभाज्या प्रदर्शन आणि विक्रीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. २५ प्रकारच्या रानभाज्या आणि औषधी वनस्पती विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. हे प्रदर्शन शारदा मंदिर कल्याण पश्चिम येथे भरविण्यात आले होते.

रानभाज्याचे आहारातील महत्त्व तसेच उपयुक्त जीवनसत्वे आणि त्यांच्यामधील औषधी गुणधर्माची माहिती नागरिकांना मिळावी या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण आणि सुभेदार वाडा कट्टा यांच्यावतीने कल्याण मध्ये रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुभेदार वाडा कट्टाचे खजिनदार अर्जुन पाटील आणि रोटरी क्लबचे अध्यक्ष रमेश मोरे यांची उपस्थिती होती. या प्रदर्शनात शहापूर तालुक्यातील आदिवासी महिलांनी रानभाज्या विक्रीसाठी आणल्या होत्या.

कल्याणमध्ये रानभाज्या महोत्सव उत्साहात (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

यामध्ये आघाज, अळू, अंबाडी, गुळवेल, चाकवत, चवळी, घोळ, करटोली, रानमेथी, माठ, शेवगा, भारंगी भोकर, टाकळा अशा २५ प्रकारच्या रानभाज्यांच्या अनोख्या प्रदर्शनाने नागरिकांना विविध पौष्टिक रानभाज्यांची ओळख करून खरेदी करण्याची संधी नागरिकांना मिळाली. यावेळी निसर्ग अभ्यासक आणि शिक्षक भारत गोडांबे यांनी रानभाज्याचे पोषणमूल्य, औषधी गुणधर्म आणि दररोजच्या आहारातील महत्व त्यांनी उपस्थितांना सांगितले. तसेच आयुर्वेदिक औषधी वनस्पती विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. यावेळी सुदृढ व निरोगी राहण्याकरिता दररोजच्या आहारात रानभाज्यांचा समावेश करण्याचा संदेश देण्यात आला.