उल्हासनगरः किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करून देण्याचे आमिष दाखवून कल्याणजवळील चिंचपाडा गाव रोड येथे राहणाऱ्या एका महिलेची तब्बल ३१ लाख ६७ हजार ८६० रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी स्थानिक डॉक्टर, कोलकाता, पश्चिम बंगाल येथील चार आरोपींसह एकूण सात जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. यापूर्वीही असाच प्रकार समोर आला होता.

चिंचपाडा गाव रोड येथील रहिवासी असलेले एक दाम्पत्य किडणी प्रत्यारोपणासाठी मदतीचा शोध घेत होते. पतीच्या किडनीचा गंभीर आजार असल्याने त्यांना प्रत्यारोपणाची गरज होती. आरोपींनी महिलेच्या याच गरजेचा गैरफायदा घेतला. त्यांनी फिर्यादी महिलेला त्यांच्या पतीच्या किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करून देतो, त्यासाठी आवश्यक किडनी देणारा दाता शोधतो आणि उपचार करतो असे खोटे आश्वासन दिले. आरोपी एवढ्यावर थांबले नाहीत. त्यांनी वेळोवेळी तक्रारदार महिलेकडे पैशांची मागणी केली.

आरोपींनी फिर्यादी यांच्याकडून २ जुलै २०२५ या तारखेपासून वेळोवेळी पैशांची मागणी केली. किडनी दात्याला देण्यासाठी लागणारी रक्कम आणि उपचारासाठी आवश्यक खर्च अशा विविध नावाखाली आरोपींनी रोख तसेच ऑनलाईन स्वरूपात मिळून एकूण ३१ लाख ६७ हजार ८६० रुपये इतकी मोठी रक्कम घेतली. इतकी प्रचंड रक्कम घेऊनही आरोपींनी कोणतीही किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

त्यांच्या तक्रारीनुसार विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात खालील सात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात पश्चिम बंगालमधील कलकत्ता येथे राहणारे मोसमी बिसवास, जयदेव बिसवास, अभिषेक मन्ना, सुमनता पांडे यांचा, तसेच आग्रीपाडा येथील इकबाल खान, भिवंडी येथील मोहम्मद अन्सारी आणि चिंचपाडा येथील डॉक्टर गौरव नायर यांचा आरोपीत समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. विठ्ठलवाडी पोलीस या फसवणूक प्रकरणाचा सखोल तपास करत असून, आरोपींना लवकरच अटक केली जाईल, अशी अपेक्षा आहे. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातील आरोपींना चौकशीसाठी बोलवणे जाणार असल्याची माहिती विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक अशोक कोळी यांनी दिली आहे. चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईले असेही कोळी यांनी सांगितले आहे. मात्र हे प्रकरणी नियोजनबद्ध गुन्हा तर नाही ना, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.