कल्याण – आपणास महानगर गॅसचे देयक आले आहे. ते आपण ऑनलाईन माध्यमातून भरा, अशी माहिती देणारी एक जुळणी एका अज्ञात इसमाने कल्याणमधील बाजारपेठ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका महिला पोलीस हवालदाराला पाठविली. ही जुळणीतील एपीके फाईल हवालदाराने आपल्या मोबाईलवर स्थापित करून त्या माध्यमातून १३ रूपये महानगर गॅसचे देयक म्हणून भरण्याचा प्रयत्न केला. ते भरणा न झाल्याने महिलेने ती प्रक्रिया पूर्ण केली नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी या महिलेच्या बँक खात्यामधून एक मिनिटाच्या अंतराने भामट्याने एकूण ३ लाख ७२ हजार रूपये परस्पर आपल्या बँक खात्यात वळते करून घेतले. आणि या महिलेची फसवणूक केली.
गेल्या तीन महिन्याच्या कालावधीत महानगर गॅस देयक भरणा करण्याच्या नावाने कल्याण, डोंबिवली परिसरातील अनेक नागरिकांची ऑनलाईन माध्यमातून लाखो रूपयांची फसवणूक केली आहे. या फसवणूक प्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
रोशनी अजिंक्य पाटील असे फसवणूक झालेल्या महिला हवालदाराचे नाव आहे. त्या भिवंडी टेमघर भागात आपल्या कुटुंबीयांसह राहतात. हवालदार पाटील यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की काही दिवसापूर्वी घरी असताना आपल्या मोबाईलवर आपणास अनोळखी व्यक्तीच्या मोबाईलवरून महानगर गॅसचे देयक भरण्यासाठी संदेश आला. हा संदेश जुळणी (लिंक) स्वरूपात होता. ही एपीके स्वरुपाची जुळणी आपण आपल्या मोबाईलवर स्थापित केली. या जुळणीच्या माध्यमातून ऑनलाईन माध्यमातून दिसत असलेले १३ रूपयांचे देयक भरण्याचा आपण प्रयत्न केला. पण तांत्रिक अडचणींमुळे देयक भरणा झाला नाही. दुसऱ्या दिवशी आपणास पुन्हा दुपारच्या वेळेत अनोळखी व्यक्ती सतत देयक भरणा करण्यासाठी संपर्क करत होती. त्या संपर्काला आपण प्रतिसाद दिला नाही. दुपारी तीन ते संध्याकाळी सहा अशा वेळेत हे फोन आपल्या फोनवर केले जात होते.
आपण त्या संपर्काला प्रतिसाद दिला नसताना, रात्रीच्या वेळेत आपल्या बँक खात्यामधून एक मिनिटाच्या अंतराने पहिल्या व्यवहारात २ लाख रूपये आणि दुसऱ्या व्यवहारात १ लाख ७२ हजार रूपये असे काढले असल्याचे लघुसंदेश आपल्या मोबाईलवर आले. आपण कोणत्याही प्रकारचे व्यवहार बँकेत किंवा ऑनलाईन माध्यमातून केले नाहीत तरीही आपल्या बँक खात्यामधून एकूण ३ लाख ७२ हजार रूपये काढून घेण्यात आल्याने आपणास संशय आला. दोन दिवसांपासून आपणास महानगर गॅसच्या नावाने संपर्क करणाऱ्या अज्ञात इसमानेच हे कृत्य केले असून त्याने आपली फसवणूक केली म्हणून हवालदार रोशनी पाटील यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात या फसवणूक प्रकरणी तक्रार केली आहे. पोलिसांनी माहिती व तंत्रज्ञान कायद्याने गु्न्हा दाखल केला आहे.
