scorecardresearch

तलवार घेऊन दहशत पसरविणारे तरूण अटकेत , कल्याण पूर्वेतील घटना

सीसीटीव्ही चित्रिकरणाच्या आधारे पोलिसांनी दोन्ही तरूणांसह त्यांच्या समर्थकांना अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले.

कल्याण- कल्याण पूर्वतील सिध्दार्थनगरमध्ये गुरूवारी मध्यरात्री दोन तरूणांनी तलवारी हातात घेऊन दहशत पसरविण्याचा प्रकार केला. सीसीटीव्ही चित्रिकरणाच्या आधारे पोलिसांनी दोन्ही तरूणांसह त्यांच्या समर्थकांना अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले.

दोन्ही गटातील तरूणांमध्ये दोन महिन्यापूर्वी भांडण झाले होते. त्या वादातून ते पुन्हा एकमेकाला आव्हान देण्यासाठी तलवारी घेऊन समोरासमोर आले होते. कल्याण पूर्वेतील सिध्दार्थनगरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास हे दोन्ही गट समोरासमोर आले. एका तरूणाने प्रतिस्पर्धी तरूणाला तलवारीचा धाक दाखवत बेदम मारहाण केली. या मारहाणीतून दोन्ही गट एकमेकांना भिडले. या मारहाणीत काही जण गंभीर जखमी झाले.

मोठ्याने ओरडा करत सिध्दार्थनगरमधील मुख्य रस्त्यावर हा प्रकार सुरू होता. परिसरातील रहिवासी घरातून हा प्रकार पाहत होते. कोळसेवाडी पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रिकरणाच्या आधारे या तरूणांचा शोध घेतला. त्यांना अटक केली. दोन्ही गटांनी परस्पर विरोधी तक्रारी केल्याने पोलिसांनी दोन्ही गटांच्या विरुध्द गुन्हे दाखल केले. मारहाण झालेल्या एका तरूणाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले.भांडणासाठी तरूणांनी तलवारी कुठून आणल्या याचा तपास पोलीस करत आहेत.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kalyan youth arrested for spreading terror with swords asj