कल्याण – थायलंडमधील पटाया येथे नृत्यांच्या विविध प्रकारांच्या स्पर्धांमध्ये कल्याणमधील रवींद्र कला विद्यालयाच्या नृत्यांंगनांनी एकूण ११ पदके पटकावली. यामध्ये एका विद्यार्थिनीने सुवर्णपदक पटकावले आहे. अखिल भारतीय सांस्कृतिक संघाने आयोजित केलेल्या ग्लोबल कौन्सिल ऑफ आर्ट्स ॲन्ड कल्चरतर्फे पंधरावी इंटरनॅशनल कल्चरल ऑलिम्पियाड परफाॅर्मिंग आर्ट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
विविध देशातील हजारो स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेसाठी कल्याणच्या रवींद्र कला विद्यालयाच्या संचालिका गुरू स्मिता परांडेकर यांच्या संस्थेची निवड झाली होती. या स्पर्धेत यश मिळावे म्हणून संचालिक परांडेकर यांनी मागील काही महिन्यांपासून या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धक विद्यार्थिनींची नियमित तालीम घेतली. त्यांना मार्गदर्शन केले होते.
या स्पर्धेत इतर देशांमधील नृत्य प्रकारांंबरोबर कथक नृत्य शैलीचे प्रकार लक्षवेधी ठरले. त्यांना स्पर्धक विद्यार्थी, उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत रवींद्र कला विद्यालयाच्या नायशा भारद्वाज हिला सुवर्ण पदक मिळाले. तिने हितांशी सोमपुरा हा निमशास्त्रीय नृत्य प्रकार सादर केला. एंजल श्रीधर हिने कथक शास्त्रीय नृत्यामधील एकल प्रकार सादर केला. तिला रौप्य पदक मिळाले. स्मृती वायकोळे हिला एकल नृत्य प्रकारातील रौप्य, पद्मजा प्रभू, माधुरी कांबळे, दीक्षा कांबळे यांना कथक शास्त्रीय नृ्त्यामधील तिहेरी प्रकारातील रौप्य पदक मिळाले. प्रियांका देशपांडे हिला निमशास्त्रीय नृत्यामधील एकल प्रकारातील कास्य पदक मिळाले. कथक एकल नृत्य प्रकारात किरण आपटे, सलोनी मंत्री हिला उत्तेजनार्थ बक्षिसे मिळाली.
आपल्या विद्यार्थिनींच्या यशस्वीतेसाठी प्रभावी प्रयत्न करणाऱ्या रवींद्र कला विद्यालयाच्या संचालिका गुरू स्मिता परांडेकर यांना पायोनियर गोल्ड मेंटर ॲवाॅर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. एकावेळी अकरा पदकांचा मान मिळाल्याने विद्यार्थिनींनी जल्लोष केला. कल्याण शहरातील विविध संस्थांनी याबद्दल समाधान व्यक्त केले. यापूर्वीच्या अनेक उपक्रम, स्पर्धांमध्ये रवींद्र कला विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी नेहमीच बाजी मारली आहे. आगामी विविध स्पर्धा, उपक्रमांमध्ये सहभागी होण्याच्या दृष्टीने विद्यालयातील विद्यार्थिनींचा नियमित सराव घेतला जातो. यासाठी विद्यार्थिनीही शालेय अभ्यासक्रमा बरोबर समर्पित भावाने नृत्याचे धडे घेतात. त्यामुळे कठोर मेहनतीमधून हे यश प्राप्त झाले आहे, असे रवींद्र कला विद्यालयाच्या संचालिका स्मिता परांडेकर यांनी सांगितले. अखिल भारतीय सांस्कृतिक संघाने ही संधी उपलब्ध करून दिल्याने रवींद्र कला विद्यालयाने समाधान व्यक्त केले.
