कल्याण: इमारतीची उभारणी करण्यापूर्वी त्या भूखंडाभोवती विकासकाने पहिले चारही बाजुने १६ फूट उंचीच्या पत्र्यांचे संरक्षित जाळे उभारणे बंधनकारक असते. या अटीशर्तीचे पालन केले नाहीतर संबंधित विकासाला स्थानिक बांधकाम परवानगी देणाऱ्या नगर नियोजन, प्राधिकरणाच्या कारवाईला सामोरे जावे लागते. मागील दोन दिवसांपासून जोरदार वाऱ्याबरोबर मुसळधार पाऊस कोसळत आहे. इमारत बांधकामाभोवतीचे हे अति उंचीचे पत्रे या जोरदार वाऱ्यासमोर तग धरत नसल्याने ही संरक्षित पत्र्यांची जाळी कोसळून पडत आहेत. त्यामुळे शासनाने विकासकांना अतिउंचीचे पत्रे बसविण्याची अट शिथील करावी, अशी मागणी कल्याण, डोंबिवली परिसरातील विकासकांकडून शासनाकडे करण्यात आली आहे.

इमारत उभारणीची कामे मुख्य वर्दळीचे, अंतर्गत रस्ते भागात सुरू असतात. ही इमारत उभारणी होत असताना आतील भागातील खोदकाम, मातीचा धुरळा, यंत्र आवाजाचा कोणताही त्रास आजुबाजुच्या वस्ती, पादचारी नागरिक, या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना होऊ नये म्हणून नवीन बांधकाम नियमावलीप्रमाणे इमारत उभारणीचे काम सुरू करण्यापूर्वी विकासकाने त्या भूखंडाच्या चारही बाजुने पहिले १६ फूट उंचीचे पत्र्यांचे संरक्षित जाळे उभारणीची अट टाकली जाते.

इमारत बांधकाम प्रस्तावाला स्थानिक पालिका, नगर नियोजन प्राधिकरणाची मंजुरी मिळण्यासाठी विकासक १६ फूट उंचीचे पत्रे आणि त्याला तेवढ्याच उंचीचे लोखंडी ॲन्गल लावून प्रस्तावित इमारतीच्या भूखंडाभोवती पत्र्यांचे संरक्षित जाळे उभारतो, असे विकासकांनी सांगितले.

धोकादायक पत्रे

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे कल्याण, डोंबिवलीसह ठाणे, मुंबई, नवी मुंबई परिसरातील अनेक विकासकांच्या नवीन इमारत उभारणी भोवतीचे १६ फूट उंचीच्या पत्र्यांची जाळी कोसळून पडली आहेत. ही जाळी कोसळून काही ठिकाणी पादचारी जखमी झाले आहेत. तर काही ठिकाणी वाहनांचे नुकसान झाले आहे. उंच जड पत्रे आणि त्याला लोखंडी ॲन्गलचा आधार, त्यामुळे हे अवजड संरक्षित पत्र्यांचे जाळे सुरक्षिततेसाठी असले तरी जोरदार वाऱ्यांसमोर ते तग धरू शकत नाही हे मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार वारे आणि मुसळधार पावसामुळे स्पष्ट झाले आहे. या उंची पत्र्यांच्या जागी बांधकाम परवानगी देणाऱ्या प्राधिकरणाने सहा ते आठ फूट उंचीचे पत्रे आणि त्याच्या वर हिरवी नायलाॅनची जाळी बसविण्याची मुभा विकासकांना द्यावी, अशी मागणी विकासकांनी केली आहे.

दोन दिवसांपासून ठाणे, मुंबई परिसरात अनेक विकासकांनी इमारत विकासाच्या जागेवर लावलेली ही पत्र्यांची संरक्षित जाळी कोसळल्याने यामुळे आमचे आर्थिक नुकसान त्याच बरोबर पादचाऱ्यांना इजा झाली आहे. शासन नियमाप्रमाणे हे पत्रे लावले नाहीत तर बांधकाम प्रस्ताव मंजुर होण्याची शक्यता कमी. त्यामुळे एकदा भूखंड विकासासासाठी हाती घेतला की पहिले या भूखंडांना १६ फूट उंचीचे पत्रे ठोकुन मोकळा होतो. पण हे पत्रे जोरदार वाऱ्यांसमोर तग धरू शकत नाहीत. त्यामुळे शासनाने याचा फेरविचार करून विकासकांना सहा ते आठ फूट उंचीचे पत्रे भूखंडाभोवती बसविण्याची मुभा देण्याची मागणी विकासकांनी शासनाकडे केली आहे.