MMRDA Metro 14 Update: मुंबई महानगर क्षेत्रातील सर्वात मोठी आणि वाहतूक कोंडीतून खऱ्या अर्थाने दिलासा देणाऱ्या कांजुरमार्ग ते बदलापूर या मेट्रो १४ मार्गिकेच्या उभारणीसाठी पुन्हा नव्याने प्रकल्प अहवालाचे पुनराविलोकन केले जाणार आहे. यापूर्वीच याचा अहवाल तयार करण्यात आला होता. त्याच्या समिक्षणासोबत अंदाजपत्रक, सर्वेक्षण आणि निविदा प्रक्रियेसह इतर कामांसाठी तज्ज्ञ सल्लागाराची नियुक्ती केली जाणार आहे.
ही मेट्रो मार्गिका मुंबई, ठाणे, नवी मुंबई अशा विविध मेट्रोंना जोडणारी एकमेव मेट्रो मार्गिका आहे. त्यामुळे या मार्गिकेच्या कामावर आता प्राधान्यांने लक्ष दिले जाते आहे. त्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) निविदा मागवल्या आहेत.
मुंबई महानगर क्षेत्रातील मेट्रोचे जाळे आता ठाणे शहरापल्याडही विस्तारले जाते आहे. यातील कल्याणमधील पहिली ठाणे – भिवंडी – कल्याण ही मेट्रो ५ आणि कल्याण ते तळोजा ही मेट्रो १२ चे काम प्रगतीपथावर आहे. त्यासह कल्याणपल्याड जाणारी पहिली मेट्रो ही मेट्रो १४ ठरू शकते. कांजुरमार्ग ते बदलापूर अशी ही मेट्रो वेगाने मार्गी लावण्यासाठी एमएमआरडीएने प्रकल्प अहवाल पुनराविलोकनासाठी निविदा मागवल्या आहेत. एमएमआरडीएने २०१९ साली मे. मेट्रो मिलानो कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेडची नियुक्ती केली.
सल्लागारांनी एमएमआरडीएला व्यवहार्यता अहवाल सादर केला होता. एमएमआरडीएने व्यवहार्यता अहवाल आयआयटी मुंबईकडे पुनरावलोकनासाठी सादर केला. त्यानंतर आयआयटी मुंबईने व्यवहार्यता अहवालावर आपले मत नोंदवले. डिसेंबर २०२५ मध्ये एमएमआरडीएने हा सल्लागार करार रद्द केला होता. त्यामुळे पुन्हा आता या अहवालाचे पुनर्विलोकन केले जाणार आहे.
मेट्रो १४ साठी तांत्रिक-आर्थिक व्यवहार्यता अभ्यासाचे समीक्षण, प्रकल्प अहवालाचे पुनरावलोकन, सविस्तर प्रकल्प अहवाल, सविस्तर अंदाजपत्रक, निविदा दस्तऐवज तयार करण्यासाठी विविध सर्वेक्षणे, तसेच निविदा प्रक्रियेच्या व्यवस्थापनासाठी तज्ञ सल्लागारांची नियुक्ती केली जाणार आहे.
कसा आहे मेट्रो मार्ग १४?
कांजुरमार्ग ते जोवेली गाव, बदलापुरपर्यंत हा मार्ग असेल
मार्गाची एकूण लांबी -४३.६९ किमी
प्रस्तावित स्थानकांची संख्या – २४ (कांजूरमार्ग येथे एक भूमिगत स्थानक).
मेट्रोची रचना – ६-डब्यांची मेट्रो ट्रेन
डिझाइन गती – ९० किमी प्रतितास तास
वाहतुकीचा सरासरी वेग-५५ किमी प्रतितास
मार्ग महत्वाचा का
मेट्रो १४ हा मार्ग विविध टप्प्यांवर विविध मार्गांना छेदून जाणार आहे. त्यामुळे या मार्गाचे महत्व वाढते.
कांजुरमार्ग येथे मेट्रो ४ आणि ६ शी इंटरचेंज
घणसोली येथे रेल्वेची ट्रान्स-हार्बर उपनगरीय रेल्वे मार्गाशी जोडणी
कल्याणच्या ग्रोथ सेंटर अर्थात कटाई नाका येथे मुख्य कल्याण शिळफाटा रस्ता आणि वसई-पनवेल रेल्वेमार्गासह इंटरचेंज
हेदुटणे येथे मेट्रो १२ ( कल्याण तळोजा ) इंटरचेंज
बदलापूर येथे मेट्रो ५ अ (शक्यता) आणि मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गिकेशी जोडणी
मेट्रोचा फायदा कसा
सध्याच्या घडीला बदलापूर, अंबरनाथहून मुंबई, नवी मुंबई प्रवासासाठी मध्य रेल्वेवरच अवलंबून राहावे लागते. नवी मुंबई प्रवासासाठी ठाणेमार्गे प्रवास करावा लागतो. मात्र या मेट्रो मार्गामुळे मेट्रो १२, मेट्रो ५ शी जोडणी होईल. मुंबईत मेट्रो ४ आणि ६ शी जोडले जाण्याने मोठा फायदा. रेल्वेवरील भार कमी होण्याची आशा आहे.
