ठाणे : गेल्याकाही महिन्यांपासून ठाणे पोलीस दलाच्या कार्यपद्धतीवर विविध घटनांमुळे प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच, ठाणे पोलीस आयुक्तालयातील कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंजुषा भोंगळे यांना कर्तव्यपालनातील कसुरी भोवली आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी मंजुषा भोंगळे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली आहे. विभागीय चौकशीनंतर त्यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील तरतुदीनुसार ‘ताशेरे ओढणे’ ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. विशेष म्हणजे, अवघ्या महिन्याभरापूर्वी याच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मानपाडा येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची निर्घृण हत्या झाली होती. त्यामुळे, मंजुषा भोंगळे यांच्यावरील या शिस्तभंगाच्या कारवाईला प्रदीप पूर्णेकर हत्याकांडाचीही किनार असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात सुरू आहे.

कापूरबावडी पोलीस ठाण्यापासून अवघ्या दोन मिनिटांच्या अंतरावर असलेल्या एका हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे गुन्हे अन्वेषण शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाच्या कारवाईतून उघड झाले होते. या कारवाईत वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या दलाल महिलेला अटक करण्यात आली, तर तिच्या तावडीतून दोन महिलांची सुटका करण्यात आली. जून महिन्यात झालेल्या या कारवाईनंतर कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी २९ ऑक्टोबर रोजी कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंजुषा भोंगळे यांच्याविरोधात शिस्तभंगाच्या कारवाईचे आदेश काढले. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कुठेही अवैध व्यवसाय सुरू राहणार नाहीत, याबाबत गुन्हे आढावा बैठकीत वेळोवेळी सूचना देण्यात आल्या होत्या. असे असतानाही कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध व्यवसाय सुरू असल्याचे आढळून आले.

पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून भोंगळे यांचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नसल्याचे, तसेच पर्यवेक्षणात ढिसाळपणा असल्याचे या घटनेतून दिसून येते. पोलीस ठाण्याचे कामकाज करण्यास सक्षम नसल्याचेही प्रथमदर्शनी निदर्शनास येत असल्याचे पोलीस आयुक्तांनी आदेशात नमूद केले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वारंवार दिलेल्या आदेशांचे पालन करत नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असून, ही तुमच्या कसूरी असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रकरणी मंजुषा भोंगळे यांनी सादर केलेला खुलासाही कसुरीच्या अनुषंगाने समाधानकारक नसल्याचे पोलीस आयुक्तांनी म्हटले आहे. विभागीय चौकशीनंतर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी अंतिम आदेश काढत भोंगळे यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील तरतुदींनुसार ‘ताशेरे ओढणे’ ही शिस्तभंगाची शिक्षा सुनावली आहे.

कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मानपाडा, मनोरमानगर, आझादनगर, कोलशेत, ढोकाळी, हायलँड, बाळकूम आणि माजिवडा यांसारख्या ठाण्यातील महत्त्वाच्या आणि वेगाने नागरिकरण होणाऱ्या परिसरांचा समावेश होतो. महिन्याभरापूर्वी याच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मानपाडा येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची निर्घृण हत्या झाली होती. त्यापूर्वी काही महिन्यांपूर्वी कापूरबावडी पोलीस ठाण्यापासून काही मीटर अंतरावर एका व्यक्तीची हत्या करून त्याचा मृतदेह पोलीस ठाण्याच्या मागील बाजूस असलेल्या नाल्यात फेकण्यात आला होता. मंगळवारी पूर्णेकर यांच्या समर्थकांनीही घोडबंदर मार्ग रोखून धरल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता. त्यातच आंदोलनानंतर पूर्णेकर यांच्या एका समर्थक तरुणाला कापूरबावडी पोलीस ठाण्यात अमानुष मारहाण करण्यात आल्याचा आरोपही पोलिसांवर झाला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांवरील शिस्तभंगाच्या कारवाईनंतर आता कापूरबावडी पोलीस ठाण्यातील अन्य अधिकाऱ्यांवरही कारवाईची टांगती तलवार निर्माण झाली आहे.