ठाणे : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर घोडबंदरसह ठाणे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. काही दिवसांपूर्वीच पूर्णेकर समर्थक असलेल्या एका तरुणाला पोलिसांनी थर्ड डिग्री देऊन त्याला अमानुष पद्धतीने मारल्याचा आरोप करण्यात आला होता. या घटनेनंतर महाविकास आघाडी आणि मनसे या विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली असून कापूरबावडी पोलीस ठाण्याला घेराव घातला. त्यामुळे हा वाद आता चिघळण्याची शक्यता आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येच्या निषेधार्थ घोडबंदर परिसरात झालेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या एका तरुणाला कापूरबावडी पोलीस ठाण्यात अमानुष मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी आपल्याला ‘थर्ड डिग्री’ दिली. एवढेच नव्हे, तर पार्श्वभागात तेल लावून दुसऱ्या संशयित आरोपीला बोट घालण्यास सांगितल्याचा धक्कादायक आरोप या तरुणाने केला आहे.
याप्रकरणी त्याने ठाणे पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार केली असून, त्याच्या वैदकीय अहवालात देखील अमानुष मारहाण झाल्याचे आढल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकारानंतर विरोधी पक्षाकडून संताप व्यक्त केला जात असून आता विरोधी पक्ष कापूरबावडी पोलीस ठाण्याला घेराव घालण्यात आला आहे.
विरोधकांनी फलक तयार करुन या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. या प्रकारामुळे पोलीस ठाण्याचा परिसरात छावणीचे स्वरुप आले आहे. पोलिसांकडून प्रचंड बंदोबस्त याठिकाणी नेमण्यात आला आहे. तर, विरोधकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
