जागतिक कराटे असोसिएशनशी संलग्न शिडोकान कराटे इंडिया (जपान) या संस्थेतर्फे येत्या सोमवारी कराटेपटू असलेले गुरू-शिष्य दोन विश्वविक्रम डोंबिवलीत करणार आहेत. शिहान श्रीनिवास राव आणि त्यांची शिष्या हर्षिता समीर परशुरामी (१४) ही गुरू-शिष्याची जोडी या विक्रमासाठी येथे येणार आहे. शिहान राव हे भारत आणि शिडोकान जपानचे दशिक्षण अशिया सचिव आहेत. शिहान सहा डॅन ब्लॅक बेल्ट आहेत. डोंबिवली पूर्वेतील स. वा. जोशी शाळेच्या मैदानावर सकाळी साडेआठ वाजता हा कार्यक्रम होणार आहेत.


शिहान राव यांचे दोन साहसी विक्रम
शिहान राव हे एका खिळ्यांच्या बिछान्यावर झोपतील. त्यांच्या अंगावर खिळ्यांनी भरलेला दुसरा बिछाना ओढण्यात येईल. दोन खिळ्यांच्या बिछान्यामध्ये शिहान यांना झोपवण्यात येणार असल्याची माहिती संस्था पदाधिकाऱ्यांनी दिली. तर दुसऱ्या प्रकारात शिहान राव यांच्या अंगावरून २५ जड बुलेट्स ५०१ फेऱ्यांमधून धावतील. असा विक्रम शिहान यांनी काही वर्षापूर्वी केला होता. त्यावेळी त्यांच्या अंगावरून १०१ बुलेट नेण्यात आल्या होत्या.


एवढ्या अल्पवयात असा विक्रम करणारी हर्षिता पहिलीच
याच मैदानावर दुसरा जागतिक विक्रम शिहान राव यांची शिष्या हर्षिता परशुरामी (वय १४) करणार आहे. हर्षिता प्रथम डॅन ब्लॅक बेल्टची मानकरी आहे. हर्षिताच्या विक्रमासाठी पाच संगमरवरी टाईल्सचे संच तयार करण्यात येतील. अशा १०८ संचांवर हातामध्ये कोणतीही अवजड वस्तू न घेता हर्षिता हाताच्या घावांनी कमीत कमी वेळात या संगमरवरी टाईल्स तोडणार आहे. एवढ्या अल्पवयात अशा प्रकारचा विक्रम आतापर्यंत जगात कोणीही केलेला नसल्याचे पदाधिकाऱ्याने सांगितले.