कर्जत शहरात सर्वाधिक ४१ अंश सेल्सिअसची नोंद
बदलापूर: गेल्या काही दिवसांपासून चढणीला लागलेल्या तापमानाच्या पाऱ्याने सोमवारी ठाणे जिल्ह्यात सरासरी ४० अंश सेल्सियसचा आकडा पार केला. उत्तरेकडून येणारे उष्ण आणि कोरडे वारे तसेच राजस्थान, गुजरातवर निर्माण झालेला उच्च दाबाचा पट्टा यामुळे ठाणे जिल्ह्यातील सर्वच भागांत तापमान ४० अंशांच्या पुढे गेले आहे. येत्या आठवडय़ातही उष्णतेची ही लाट कायम राहण्याचा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तवला आहे.
गेल्या वर्षांत सुमारे आठ महिने पावसाळय़ाचा अनुभव घेतल्यानंतर जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांत ठाणे जिल्ह्यातील तापमान आठ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरले होते. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात कडकाच्या थंडीचा अनुभव यंदा आला. त्यानंतर यंदाच्या उन्हाळय़ात तापमान उच्चांक गाठेल अशी शक्यता होती. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवडय़ापासूनच तापमानात वाढ झाल्याने उकाडा वाढला होता. सोमवारी ठाणे जिल्ह्यातील जवळपास सर्वच शहरांमध्ये तापमानाने चाळिशी गाठली होती. कर्जत शहरात सर्वाधिक ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
सकाळी ११ वाजल्यापासून उन्हाच्या झळा तीव्र झाल्यामुळे भरदुपारी नागरिक घराबाहेर पडण्याचे टाळत आहेत. परिणामी दुपारनंतर बाजारातही कमी गजबज पाहायला मिळत आहे. उत्तरेतून येणाऱ्या कोरडय़ा आणि उष्ण वाऱ्यामुळे कोकणातील तापमानात वाढ होत असल्याची माहिती खासगी हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली आहे. गुजरात आणि राजस्थानवर तयार झालेल्या उच्च दाबाच्या पट्टय़ामुळे (हाय प्रेशर झोन) तापमानात वाढ होते आहे. तसेच समुद्रकिनारी असलेल्या शहरांमध्ये समुद्रावरून येणारे वारे उशिरा येत असल्याने अकरापासूनच तापमानात वाढ होण्यास सुरुवात होते. हवेतील साक्षेपी आद्र्रता १० पेक्षा खाली गेल्याने तापमानात वाढ होत असल्याचे निरीक्षण मोडक यांनी नोंदवले आहे. भारतीय हवामान खात्याने या आठवडय़ात बुधवापर्यंत ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये तापमान उच्चांकी गाठेल, असा अंदाज वर्तवला आहे, तर आठवडय़ाच्या शेवटापर्यंत उन्हाच्या झळा बसतील अशी शक्यता आहे. येत्या आठवडाभरात नागरिकांनी दुपारी १२ ते ४ या काळात बाहेर फिरणे टाळावे. दिवसभरात पाण्याचे भरपूर सेवन करावे, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
जिल्हा प्रशासनाचे आवाहन
भारतीय हवामान विभागाने बुधवार, १६ मार्च पर्यंत मुंबई, रायगड, पालघरसह ठाणे जिल्ह्यातही उष्ण लहर जाणवणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने नागरिकांना उष्माघातापासून बचाव करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.या काळात दुपारी बारा ते चार या दरम्यान शक्य असल्यास घराबाहेर पडू नये असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलाश पवार यांनी म्हटले आहे.
काय काळजी घ्याल?
ल्ल जास्तीत जास्त पाणी प्यावे.
ल्ल हलके, पातळ आणि सुती कपडे वापरावेत.
ल्ल बाहेर जाताना उन्हापासून संरक्षण करणारा चष्मा, छत्री, टोपी यांचा वापर करावा.
ल्ल प्रवासादरम्यान पाण्याची बाटली सोबत ठेवावी, उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा.
ल्ल ओल्या कपडय़ाने डोके, चेहरा झाकावा.
ल्ल दुपारी बारा ते चारदरम्यान शक्यतो घराबाहेर पडू नये.