एकीकडे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादाचा प्रश्न दिवसेंदिवस चिघळत चालला असतानाच, दुसरीकडे दिवा परिसर ठाणे महापालिका हद्दीतून वगळण्याची मागणी जागा हो दिवेकर या संस्थेने केल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत. गेले अनेक वर्षे ठाणे महापालिका क्षेत्रात असूनही अनेक मुलभूत सोयी सुविधांपासून वंचित असल्याचा दावा करत या संस्थेने दिवा परिसर नवी मुंबई महापालिका क्षेत्रात जोडण्याची मागणी केली आहे. त्यामुळे दिवा सीमावादाचा प्रश्न निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>कळवा रेल्वे स्थानकात महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचली

यासंदर्भात संस्थेचे अध्यक्ष विजय भोईर यांनी ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना पत्र दिले आहे. ठाणे महापालिका स्थापित होऊन जवळपास ४० वर्षे होऊन गेली. त्यात बरीच खारजमीन, खाडीप्रदेश समाविष्ट झाला. त्यात खूप मोठा भाग म्हणजे दिवा ग्रामीण परिसर आहे. ज्यात दातीवली, बेतवडे,साबे, आगासन, म्हातार्डी, देसाई , पडले, खिडकाली शीळ, खार्डी असा बराचसा खाडीकिनारी परिसर ठाणे महापालिकेने खूप मोठी आश्वासने देऊन समाविष्ट करून घेतला. ज्याला आधीपासूनच भूमीपुत्रांचा विरोध होता. परंतु महापालिकेने काही स्थानिकांना विश्वासात घेऊन ग्रामस्थांचा विश्वास संपादन केला. परंतु दुर्दैवाने आम्ही ठेवलेला विश्वास म्हणजे आमचा विश्वासघातच ठरला. ठाणे महापालिका आज इतकी वर्षे होऊन आम्हाला कोणत्याही मूलभूत सुविधा पुरवू शकले नाही, असा आरोप भोईर यांनी पत्रात केला आहे.

हेही वाचा >>>बारामतीत वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला लुटले; विद्यार्थ्याला विवस्त्र करुन ध्वनिचित्रफीत प्रसारित करण्याची धमकी

पिण्याचे पाणी अजून आम्हाला मिळत नाही. याउलट दिव्यातील कित्येक नागरिकांना पिण्याचे पाणी ट्रेनने वाहून आणताना आपला जीव गमवावा लागला. साधे आरोग्य केंद्र, स्वच्छतागृहे नाहीत, कोणतीही कामे निघाली तर तीसुद्धा फक्त निव्वळ पैसे कमावण्याचे साधन बनले. रस्ते दुरुस्ती, गटारे कामे फक्त एक भ्रष्टाचाराचे साधन बनले. दिवा व परिसर जणू काही भ्रष्टाचाराचीच खाण बनला आहे. हेतुपुरस्सर दिव्याला विकासापासून वंचित ठेवले गेले. आता आम्हा दिवावासीयांची सहनशक्ती संपली आहे. यावर आता एकच तोडगा तो म्हणजे दिवा परिसर ठाणे महापालिता क्षेत्रातून वगळून नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. सुरूवातीला आम्हाला नवी मुंबई महापालिकेने सामील करून घेण्यासाठी प्रस्ताव ठेवला होता. परंतु आम्ही नकार देऊन नंतर ठाणे महापालिकेत समाविष्ट होण्याचा निर्णय घेतला. ज्याचा आता आम्हाला खूप पश्चाताप होत आहे. तरी आम्ही आमची चूक सुधारू इच्छित आहोत. त्यासाठी दिवा ग्रामीण व आजूबाजूच्या परिसराला नवी मुंबईत समाविष्ट करावे, असेही त्यांनी म्हटले आहे. नवी मुंबईत देखील भरपूर परिसर दिव्याप्रमाणेच होते. परंतु अचूक नियोजन आणि पारदर्शक कारभारामुळे आज नवी मुंबईचा कायापालट आपण पाहत आहोत. म्हणूनच आम्हाला परत एकदा नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करून घ्यावे आणि आमची या सर्व नरकयातनातून सुटका करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karnataka maharashtra border dispute diva borderism problem thane demand include part diva area navi mumbai amy
First published on: 07-12-2022 at 17:19 IST