Kasara Karjat Local Train Crowd Passenger Protest Warning: मध्य रेल्वे प्रशासनाने छटपूजेनिमित्त बाहेरील राज्यांसाठी ४१८ विशेष मेल-एक्स्प्रेस सोडण्याची घोषणा केली आहे. या निर्णयाला आमचा विरोध नाही. मात्र, त्याच वेळी कसारा, कर्जत रेल्वे मार्गावर दररोज जीवघेणा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी नव्या १२ डब्यांच्या १२ उपननगरी रेल्वेगाड्या १ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा. अन्यथा १ डिसेंबरपासून प्रवासी आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा कल्याण-कसारा ते कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव यांनी रेल्वे प्रशासनाला दिला. मध्य रेल्वे प्रशासनाने २०१० नंतर कसारा, कर्जत रेल्वे मार्गावर आतापर्यंत एकही नवी रेल्वेगाडी वाढवली नाही.

विशेष ट्रेनच्या नावाखाली रेल्वेने २०१० ते २०२६पर्यंत सुमारे १०० हून अधिक मेल एक्सप्रेस वाढवल्या आहेत. दरवर्षी विशेष ट्रेनच्या नावाखाली या मेल, एक्सप्रेस वाढविल्या जात आहेत. कसारा व कर्जत विभागातील तिसऱ्या-चौथ्या मार्गिकेचे काम सुरू होऊन दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र ही मार्गिका पूर्ण होण्यासाठी कामाची गती, त्यात येणारे अडथळे पाहता आणखी दोन वर्षे या मार्गिकेसाठी वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे ही मार्गिका सुरू होण्याची वाट न पाहता रेल्वे प्रशासनाने १ नोव्हेंबरपासून कर्जत, कसारा रेल्वे मार्गावर नव्या गाड्या वाढवाव्यात, असे घनघाव यांनी मागणीत म्हटले आहे.

कर्जत, कसाराकडून मुंबईत दररोज नोकरी, शिक्षण, व्यवसायानिमित्त जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. अनेक वर्ष सकाळ, सायंकाळी चालवल्या जाणाऱ्या ठराविक उपनगरी रेल्वेगाड्या या प्रवासी गर्दीला अपुऱ्या पडत आहेत. सकाळी या मार्गावर अधिक गाड्यांची गरज आहे. एकीकडे उत्सवासाठी ४१८ गाड्या सोडण्यासाठी रेल्वेकडे इंजिन, डबे, कर्मचारी व मार्ग उपलब्ध होतो, दररोजच्या मुंबईच्या कामगारांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, नोकरदारांसाठी १० ते १२ वाढीव लोकल सोडायला रेल्वेला वेळ का नाही, असा सवाल घनघाव यांनी केला.

संघटनेच्या प्रमुख मागण्या

कर्जत, कसारा तिसऱ्या-चौथ्या मार्गिका पूर्ण होईपर्यंत तातडीने किमान १२ वाढीव उपनगरीय रेल्वेगाड्या सुरू करण्यात याव्यात. सकाळी कसारा ते सीएसएमटी व सायंकाळी सीएसएमटी ते कसारा,कर्जत दरम्यान १२ डब्यांच्या जलद गाड्या वाढवाव्यात. कसारा दिशेकडील प्रवाशांसाठी टिटवाळा ते आसनगाव, कसारा गाडी सुरू करावी. कर्जतकडील प्रवासासाठी बदलापूर ते कर्जत उपनगरी रेल्वेगाडी सुरू करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.