ठाणे : कसारा मार्गावर टेकड्यांवरील माती संरक्षण जाळी बसविताना धावत्या लोकलमध्ये तब्बल तीन मीटर लांबीचा राॅड पडून दोन प्रवासी जखमी झाले होते. यातील एकनाथ ठोमरे यांचा नुकताच मृत्यू झाला. याप्रकरणी आसनगाव रेल्वे पोलीस ठाण्यात ठेकेदाराच्या कामगारांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अपघातामुळे उपनगरीय रेल्वे प्रवास करणाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तर रेल्वेच्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याचे कळते आहे.

पालघर जिल्ह्यातील मोखाडा भागात एकनाथ ठोमरे हे त्यांच्या कुटुंबासह वास्तव्यास असून ते वाशिंद येथील एका खासगी कंपनीत काम करत होते. २२ एप्रिल यादिवशी ते मित्रासोबत कामाहून घरी परतत होते. वाशिद रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एक येथून त्यांनी दुपारी ३.५८ वाजता कसारा रेल्वेगाडीत प्रवेश केला. रेल्वेगाडी दुपारी ४.३५ वाजता खर्डी आणि उबंरमाळी रेल्वे स्थानका दरम्यान आली असता, येथील रुळांलगत असलेल्या टेकड्यांवर सुरक्षेच्या कारणास्तव जाळी बांधण्याचे काम केले जात होते. कामगार जाळी बांधत असताना येथील सुमारे तीन मीटर लांब राॅड रेल्वेत पडला आणि तो एकनाथ ठोमरे यांच्या डोळ्याला आणि डोक्याला

लागला. या घटनेत एकनाथ हे गंभीर जखमी झाले. तर दुसऱ्या एका प्रवाशाला पायाला दुखापत झाली. अपघातानंतर रेल्वेगाडी थांबविण्यात आली. रेल्वे गार्डने पाहणी केल्यानंतर ट्रेन पुन्हा सुरु झाली. रेल्वेगाडी कसारा स्थानकात आल्यानंतर एकनाथ यांना त्यांच्या मित्राने आणि पोलिसांनी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले. तेथून त्यांना डोंबिवली आणि ठाणे येथील खासगी रुग्णालयात नेले. त्यानंतर त्यांना मुंबई येथील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. २७ एप्रिलला उपचारा दरम्यान एकनाथ ठोमरे यांचा मृत्यू झाला.

या अपघाताप्रकरणी एकनाथ यांच्या भावाने जबाब दिला होता. त्यानुसार, ठेकेदारांच्या कामगारांविरोधात आसनगाव लोहमार्ग पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बी एन एस), २०२३ चे कलम १०६ (१) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.