ठाणे : आसनगाव-कसारा तिसरी मार्गिका आणि कसारा यार्डमधील ‘अप’ यार्ड लाईन विस्तारीकरणाच्या कामासाठी मध्य रेल्वेकडून कसारा येथे ७ ते १८ ऑक्टोबरदरम्यान १२ दिवसांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकच्या पहिल्या टप्प्यात ७ ते ९ ऑक्टोबरदरम्यान उपनगरीय तसेच मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम होणार आहे. त्यामुळे कसारा मार्गावरील प्रवाशांना नियोजन करून प्रवास करावा लागणार आहे.
आसनगाव-कसारा तिसरी मार्गिका ही कसारा-कल्याणदरम्यानच्या तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिका प्रकल्पाचा भाग आहे. या मार्गिकेमुळे मेल-एक्स्प्रेस आणि उपनगरीय रेल्वे वाहतूक स्वतंत्र करण्यास मदत होणार असून भविष्यातील अतिरिक्त रेल्वे सेवांसाठी मार्गिका क्षमता वाढविणे शक्य होणार आहे. तसेच गाड्यांच्या वाहतुकीचे नियमन अधिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
लोकल आसनगावपर्यंतच
७ आणि ८ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३५ ते रात्री ८.३५ या वेळेत ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात आसनगाव-कसारा दरम्यान उपनगरीय सेवा उपलब्ध राहणार नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून दुपारी १.१०, २.१७, २.४६ आणि ४.५० वाजता सुटणाऱ्या कसारा लोकल आसनगाव येथेच थांबविण्यात येतील. त्याचप्रमाणे कसारा येथून सुटणाऱ्या काही लोकल आसनगावहून पुढे रवाना केल्या जातील.
७ आणि ८ ऑक्टोबर रोजी ब्लॉकपूर्वी कसारासाठी शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून दुपारी १२.३० वाजता, तर सीएसएमटीसाठी कसारा येथून शेवटची लोकल दुपारी २.४२ वाजता सुटेल. ब्लॉकनंतर कसारासाठी पहिली लोकल सीएसएमटीहून सायंकाळी ६.२८ वाजता, तर सीएसएमटीसाठी कसारा येथून पहिली लोकल रात्री ८.३५ वाजता सुटेल.
मध्यरात्री काही लोकल रद्द
८ आणि ९ ऑक्टोबरच्या मध्यरात्री १२.३० ते पहाटे ५.३० या वेळेतही ब्लॉक राहणार आहे. त्यामुळे सीएसएमटी-कसारा मार्गावरील रात्रीच्या दोन लोकल, टिटवाळा-ठाणे लोकल आणि कसारा-सीएसएमटी लोकल रद्द करण्यात येणार आहेत. ब्लॉकपूर्वी कसारासाठी शेवटची लोकल सीएसएमटीहून रात्री ९.३२ वाजता, तर सीएसएमटीसाठी कसारा येथून रात्री १० वाजता सुटेल. ब्लॉकनंतर या मार्गावरील पहिल्या लोकल अनुक्रमे पहाटे ४.१९ आणि ४.५९ वाजता धावतील.
एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळेत बदल
ब्लॉकमुळे काही मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या सुटण्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस-बनारस एक्स्प्रेस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस-पाटलिपुत्र एक्स्प्रेस या गाड्या ८ ऑक्टोबरऐवजी ९ ऑक्टोबरच्या पहाटे अनुक्रमे ४ आणि ४.१५ वाजता सुटतील. सीएसएमटी-अमृतसर एक्स्प्रेसही ९ ऑक्टोबरला पहाटे ४ वाजता रवाना होईल. सीएसएमटी-बनारस महानगरी एक्स्प्रेस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर कुशीनगर एक्स्प्रेसच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे.
याशिवाय इगतपुरी, खर्डी आणि आटगाव येथे काही एक्स्प्रेस गाड्यांना नियमन करण्यात येणार असून, भुसावळ विभागातही काही गाड्या ३० मिनिटांपासून एक तास २५ मिनिटांपर्यंत नियंत्रित केल्या जातील. सलग गाड्या येत असल्याने काही मेल-एक्स्प्रेस गाड्यांना विलंब होण्याची शक्यता आहे.
