ठाणे : ठाणे ते भिवंडी शहरादरम्यानचा प्रवास सुकर करण्यासह वाहतूक कोंडीची समस्या कमी करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) कासारवडवली ते खारबाव खाडी पूल प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी ठाणे महापालिका क्षेत्रातील तब्बल ३३९ वृक्ष बाधित होणार असून त्यापैकी २४२ वृक्ष तोडण्यात येणार आहेत. उर्वरित ९७ वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. बाधित वृक्षांमध्ये पिंपळ, वड, बोर, करंज, काटेसावर, बेहडा यांसारख्या विविध प्रजातींचा समावेश आहे. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होणार असल्याने पर्यावरणप्रेमींकडून या निर्णयाला तीव्र विरोध करण्यात आला आहे.

गुजरात, वसई-विरार, उरण येथील जेएनपीए बंदर तसेच नाशिक आणि अन्य भागांतून येणारी हजारो जड-अवजड वाहने घोडबंदर मार्गे माजिवडा आणि खारेगाव टोलनाका परिसरातून पुढे जातात. या वाहनांमुळे ठाणे शहरातील वाहतुकीवर मोठा ताण येतो आणि वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. ही समस्या कमी करण्यासाठी ठाणे आणि भिवंडीला थेट जोडणारा कासारवडवली-खारबाव खाडी पूल प्रकल्प एमएमआरडीएकडून उभारण्यात येत आहे.

कासारवडवली परिसराला भिवंडीतील खारबावशी जोडणाऱ्या या प्रकल्पाचे काम २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट एमएमआरडीएने ठेवले आहे. या प्रकल्पाला ठाणे खाडी किनारी मार्गिका प्रकल्पाचीही जोड मिळणार आहे. मात्र, प्रकल्पाच्या बांधकामासाठी ठाणे महापालिका क्षेत्रातील मोठ्या संख्येने वृक्ष बाधित होत असल्याने पर्यावरणाचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

या वृक्षतोडीसाठी एमएमआरडीएच्या कार्यकारी अभियंत्यांनी ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडे वृक्षतोड आणि पुनर्रोपणासाठी प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावानंतर महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने जाहीर सूचना प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार प्रकल्पाच्या कामात ३३९ वृक्ष बाधित होणार असून त्यापैकी २४२ वृक्ष तोडण्यात येणार असून नागरिकांकडून आक्षेप आणि सूचना मागविण्यात आल्या आहेत.

दरम्यान, प्रकल्पाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याने पर्यावरणप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणी कायदेशीर नोटीस बजावण्याची तयारी सुरू असल्याचे पर्यावरणवादी कार्यकर्ते रोहित जोशी यांनी सांगितले.

चौकट यापूर्वी प्रकल्पातील बाधित वृक्षांना अशास्त्रीय पद्धतीने ‘जंगली वृक्ष’ असे संबोधण्यात आल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला होता. आता प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीतही काही वृक्षांची नोंद ‘अनोळखी वृक्ष’ अशी करण्यात आली आहे. वृक्षांची प्रजाती ओळखण्यासाठी महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडे तज्ज्ञ आहेत की नाहीत, असा प्रश्न पर्यावरणवाद्यांकडून उपस्थित करण्यात आला आहे.

या प्रकरणी ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाचे वृक्ष अधिकारी केदार पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. ‘वृक्ष प्राधिकरण रबरी शिक्का’ -महापालिका निवडणुकीच्या निकालाला सहा महिने उलटूनही ठाणे वृक्ष प्राधिकरण कायदेशीररित्या गठीत झाली नाही. त्यामुळे नागरिकांचे प्रतिनिधित्व करणारे पर्यावरणतज्ज्ञही प्राधिकरणात नाहीत.

-वृक्ष प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचा कारभार अत्यंत बेजबाबदार आणि ढिसाळ आहे. विकासकाने प्रस्तावामध्ये अनेक वृक्षांच्या प्रजातींची ओळख न करता त्यांना ‘अनोळखी’ ठरवले. पुनर्रोपण करण्यात येणाऱ्या वृक्षांचीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही.

-अनेक अनिवार्य कागदपत्रांची पूर्तता करण्यात आलेली नाही. अशा परिस्थितीत अधिकाऱ्यांनी प्रस्तावावर आक्षेप घेऊन तो फेटाळणे अपेक्षित होते. मात्र, आपले मूळ कर्तव्य पार पाडण्याऐवजी सरकारी यंत्रणांकडून आलेले प्रस्ताव डोळे झाकून मंजूर करण्यासाठी वृक्ष प्राधिकरण केवळ ‘रबरी शिक्का’ म्हणून काम करत असल्याचे दिसत असल्याचा आक्षेप पर्यावरणवादी कार्यकर्ते रोहित जोशी यांनी नोंदवला.