अंबरनाथ: काटई-अंबरनाथ या वर्दळीच्या मार्गावर गेल्या काही दिवसांपासून वाहतूक कोंडीची मोठी डोकेदुखी निर्माण झाली आहे. बेशिस्त वाहनचालक, सिग्नल यंत्रणेचा अभाव आणि वाहतूक पोलिसांची अनुपस्थिती यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना आणि नागरिकांना दररोज मनस्ताप सहन करावा लागत आहे. सोमवारी रात्रीही या मार्गावर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी झाल्याने मुंबईहून थकून भागून घरी परतणारे प्रवासी तासन तसस रस्त्यावरच अडकून पडले होते.

काटई नाका ओलांडून अंबरनाथच्या दिशेने येताना सर्वप्रथम खोणी फाटा, नेवाळी नाका, त्यापुढे रस्ता खराब असल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. त्यातच अंबरनाथ शहरात प्रवेश करताच पुन्हा कोंडीला सुरुवात होते. या मार्गावर टी जंक्शन चौक, ग्रीन सिटी फाटा, पिंक सिटी फाटा, एमआयडीसी फाटा, आनंद नगर औद्योगिक वसाहत प्रवेशद्वार आणि पाटील पेट्रोल पंप या प्रमुख ठिकाणी वाहतुकीचा मोठा गोंधळ उडतो. या संपूर्ण पट्ट्यामध्ये केवळ एकाच ठिकाणी सिग्नल यंत्रणा आहे. इतर कोणत्याही चौकात सिग्नल नसल्याने वाहनचालक अत्यंत बेशिस्तपणे आपली वाहने मध्येच घुसवत असतात एकाच जागी वाहनांची मोठी गर्दी होते.

वाहतूक पोलिसांचे सोयीस्कर दुर्लक्ष

सकाळी आणि विशेषतः संध्याकाळच्या वेळी, जेव्हा औद्योगिक वसाहतींमधून हजारो कामगार सुटतात आणि मुंबई-ठाण्याहून येणाऱ्या चाकरमान्यांची वाहने या मार्गावर येतात, तेव्हा ही कोंडी अधिकच गंभीर रूप धारण करते. अशा गर्दीच्या वेळी चौकांमध्ये वाहतूक नियंत्रित करण्यासाठी एकही वाहतूक पोलीस उपस्थित नसतो. पोलिसांच्या या अनुपस्थितीमुळे वाहनचालकांचे फावते आणि कोंडी अधिकच वाढते.

सिग्नल यंत्रणा उभारण्याची मागणी

  • आनंद नगर एमआयडीसीतून पुढे आल्यावर अंबरनाथच्या प्रवेशद्वारावर असलेल्या फॉरेस्ट नाका चौकातही रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अनधिकृत दुकाने, टपऱ्या आणि वाहने रस्त्यावरच अस्ताव्यस्त उभी केली जातात. वाहने यामुळे अर्ध्याहून अधिक रस्ता व्यापला जातो. परिणामी, येथील सिग्नल यंत्रणा कोलमडून पडते आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात.
  • मुंबईतून आधीच दोन-तीन तास प्रवास करून आलेले चाकरमानी आणि दिवसभर काम करून थकून जाणारे कामगार या रोजच्या जीवघेण्या वाहतूक कोंडीमुळे पूर्णपणे हतबल झाले आहेत. वाहतूक पोलिसांनी या मार्गावर तत्काळ लक्ष घालून बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करावी, महत्त्वाच्या चौकांमध्ये सिग्नल यंत्रणा उभारावी आणि गर्दीच्या वेळी पोलिसांची नेमणूक करावी, अशी मागणी आता प्रवाशांकडून होत आहे.