बदलापूरः आजच्या काळात राजकारणी फुटक वाटण्याचा जो प्रकार करतात तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात नव्हता. त्या काळात शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी निर्णय घेतला. ज्या ज्या शेतकऱ्यांना ज्या ज्या गोष्टींची मदत हवी होती, त्या गोष्टी दिल्या. मात्र काही काळानंतर त्यातली भांडवली मुद्दल परतही घेतली. त्यामुळे त्यांचे धोरण आदर्श होते, असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक कौस्तुभ कस्तुरे यांनी केले. बदलापुरात आयोजीत शिवराज्याभिषेकाची गाथा या व्याख्यानाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी शिवराज्याभिषेकाचा सोहळा श्रोत्यांपुढे उभा केला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त शुक्रवारी बदलापूर पश्चिमेतील पाटील बॅन्क्वेट येथे प्रेस क्लब ऑफ बदलापूर आणि संवेग फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिवराज्याभिषेकाची गाथा या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी इतिहास अभ्यासक कौस्तुभ कस्तुरे प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित होते. यावेळी शिवछत्रपतींनी लिहलेल्या मुळ पत्रांचे प्रदर्शन मांडले होते. सुप्रसिद्ध चित्रकार सचिन जुवाटकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रेखाटलेल्या चित्राचे अनावरण संवेग फाऊंडेशनच्या श्रीधर पाटील यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव केला. त्यानंतर कौस्तुभ कस्तुरे यांनी राज्याभेषिकाच्या १३ दिवसांच्या सोहळ्याचा वृत्तांत उपस्थित श्रोतांसमोर सांगितला.
शिवराज्याभिषेक सोहळ्यात उपस्थित असलेले सभासद आणि काही परदेशी पाहुण्यांनी या सोहळ्याचे विस्तृत चित्रण केले आहे. त्याचा दाखला देत कौस्तुभ कस्तुरे यांनी शिवराज्याभिषेक सोहळा श्रोत्यांपुढे उलगडून सांगितला. शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळा विविध विधी आणि कार्यक्रमांनी भरलेला होता. राज्याभिषेक, राज्यारोहण आणि राज्यदर्शन अशा तीन टप्प्यात हा सोहळा पूर्ण झाला. सोहळ्यात दहा दिवस आधी विधी सुरू झाले होते.
पहिल्या दिवशी महाराजांची मुंज झाली मग नियोजीत धार्मिक पद्धतीने राणी सोयराबाई यांच्याशी विवाह, त्यानतंर महाराजांची विविध प्रकारची तुला झाली. इंद्री शांती, विष्णू याग असे विधीही झाले. राज्याभिषेकाच्या दिवशी देशभरातील नद्यांतून आणलेल्या पाण्याने, तेलाने स्नान अशा अनेक गोष्टी त्यावेळी होत्या, असे कौस्तुभ कस्तुरे यांनी सांगितले. सिंहासनावर बसल्यानंतर महाराजांची सुरूवातीला घोडा आणि नंतर हत्तीवरून रायगडावर मिरवणुक काढण्यात आली. हा राज्यदर्शन सोहळा होत असताना कवी भुषण यांनी त्यावर काव्यही केले, त्यातून या सोहळ्याची महती कळते, असे कस्तुरे म्हणाले.
राज्याभिषेक सोहळा महत्वाचा आणि दूरगामी परिणाम करणारा ठरला. त्यानंतर शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्वीजय केला. त्यानंतर दक्षिणेत मराठा साम्राज्याचे वर्चस्व वाढले. राज्यांच्या कारभारात एक आदर्शपणा होता. महाराजांनी गोव्यातील धर्मांतर रोखले, पाद्रींनी वेळेप्रसंगी कठोर शिक्षा दिली. धर्मांतरण करणाऱ्या पाद्रींनाही हिंदू धर्मात येण्याचा प्रस्ताव महाराजांनी दिला होता, त्याचे पुरावे आहेत असेही यावेळी कस्तुरे म्हणाले.
समष्ठीसाठी प्रयत्नाची गरज
यावेळी बोलताना संवेग फाऊंडेशनचे प्रमुख श्रीधर पाटील यांनी आपल्या सर्वांना समष्टीसाठी प्रयत्नशील राहायला हवे असे आवाहन केले. आपल्या मुलांची वाढ कोणत्या वातावरणात होते हे महत्वाचे आहे. आपल्या घराबाहेर, रस्त्यावर, चौकात सुरू असलेल्या चुकीच्या प्रकारांना विरोध करायला हवा. ही समष्ठी त्यांच्या भविष्यासाठी महत्वाची आहे, असे पाटील यावेळी म्हणाले. याप्रसंगी प्रेस क्लब ऑफ बदलापुरचे सदस्य, स्वप्ना पाटील यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते.