kdmc action against illegal hawkers goods seized in dombivli east area zws 70 | Loksatta

डोंबिवली पूर्व भागात फेरीवाल्यांचे साहित्य जप्त, जुना फर्निचर बाजारावर कारवाई

सकाळच्या वेळेत डोंबिवली रेल्वे स्थानकात जाणाऱ्या नागरिकांना रस्ते, पदपथ मोकळे असावेत अशी नागरिकांची मागणी आहे.

kdmc action against illegal hawkers
डोंबिवली पूर्वेतील रेल्वे स्थानक भागातील फेरीवाल्यांवर फ प्रभागातील अधिकाऱ्यांनी कारवाई केली.

डोंबिवली– रस्ते, पदपथ नागरिकांना मोकळे असले पाहिजेत या अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांच्या आदेशानंतर डोंबिवली पूर्व फ प्रभागाने रेल्वे स्थानक परिसरातील, वर्दळीच्या रस्त्यांवर बसणाऱ्या फेरीवाल्यांचे साहित्य जप्त केले. पाथर्ली नाक्यावरील पदपथावरील जुन्या फर्निचर बाजारावर कारवाई करुन तेथील सामान जप्त करण्यात आले.

हेही वाचा >>> ठाणे जिल्ह्यात होणार अत्याधुनिक शाळांची निर्मिती; पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे प्रशासनाला आदेश

फेरीवाल्यांवर कारवाई केली नाहीतर कर्तव्यात कुचराई केली म्हणून कारवाईचा इशारा दोन दिवसापूर्वी अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांनी दिला होता. या आदेशानंतर फ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त भरत पाटील, पथक प्रमुख मुरारी जोशी, साहाय्यक मिलिंद गायकवाड यांच्या पुढाकाराने फेरीवाला हटाव पथकाने फडके रस्ता, बाजीप्रभू चौक, नेहरु रस्ता, मानपाडा, चिमणी गल्लीतील फेरीवाल्यांचे सामान जप्त केले. फेरीवाल्यांच्या काही हातगाड्या जागीत तोडण्यात आल्या तर काही जप्त करण्यात आल्या. सकाळपासून रात्री १० वाजेपर्यंत ही कारवाई यापुढे सुरू ठेवली जाणार आहे, असे फ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त भरत पाटील यांनी सांगितले.

सकाळच्या वेळेत डोंबिवली रेल्वे स्थानकात जाणाऱ्या नागरिकांना रस्ते, पदपथ मोकळे असावेत अशी नागरिकांची मागणी आहे. फ प्रभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी दुपारपासून फ प्रभाग हद्दीतील रस्ते, पदपथांवरील फेरीवाल्यांवर कारवाई केली. पाथर्ली नाका येथे पदपथावर घराचे जुने दरवाजे, खिडक्या आणि इतर लाकडी सामान ठेऊन पाथर्ली, इंदिरानगर भागातील रहिवासी जुन्या फर्निचरची विक्री करतात. या सामानामुळे पदपथ अडून राहतो. नागरिकांना रस्त्यावरुन चालता येत नाही म्हणून फ प्रभागात साहाय्यक आयुक्त पाटील यांच्याकडे काही नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. या तक्रारीवरुन पाथर्ली येथील जुने फर्निचर बाजारावर कारवाई करुन तेथील सामान जप्त करण्यात आले.

हेही वाचा >>> ठाणे जिल्ह्यात हवेचा दर्जा खालावलेलाच, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून माहिती देण्यास टाळाटाळ

फेरीवाले रस्त्यावर बसू नयेत म्हणून प्रत्येक रस्त्यावर फेरीवाला हटाव पथकातील दोन कामगार तैनात केले जाणार आहेत. कोणीही फेरीवाला लपून रस्ते, पदपथावर व्यवसाय करण्यास आला की त्याला तेथे तात्काळ रोखले जाणार आहे. रेल्वे स्थानक भागातील फेरीवाल्यांवर दंडात्मक, फौजदारी कारवाई केली जाणार आहे, असे साहाय्यक आयुक्त भरत पाटील यांनी सांगितले.

“फ प्रभाग हद्दीतील सर्व रस्त्यांवरील रस्ते, पदपथावर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करुन त्यांचे सर्व साहित्य जप्त केले आहे. यापुढे पदपथ, रस्ते अडवून बसणाऱ्या फेरीवाल्यांवर सामान जप्ती, दंडात्मक आणि प्रसंगी फौजदारी कारवाईचा निर्णय घेतला आहे.”

भरत पाटील – साहाय्यक आयुक्त फ प्रभाग, डोंबिवली

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-02-2023 at 16:27 IST
Next Story
ठाणे जिल्ह्यात होणार अत्याधुनिक शाळांची निर्मिती; पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे प्रशासनाला आदेश