डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागाला फेरीवाल्यांचा विळखा पडला आहे. पादचाऱ्यांना या भागातून येजा करणे शक्य होत नाही. अशा आशयाचे वृत्त बुधवारी ‘लोकसत्ता’च्या ठाणे सहदैनिकाने प्रसिद्ध करताच, आज सकाळीच फ आणि ग प्रभागातील फेरीवाला हटाव पथकातील कामगारांनी फेरीवाल्यांना हटविण्याची मोहीम राबविली. रेल्वे स्थानक भागात एकही फेरीवाला दिसत नसल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालिकेच्या ग आणि फ प्रभागाने अशी दररोज सकाळ, संध्याकाळ कारवाई केली तर डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील रस्ते, पदपथ मोकळे राहतील. पादचारी, प्रवाशांना या भागातून येजा करणे शक्य होईल. सकाळी रेल्वे स्थानकाजवळ रिक्षेतून उतरले की फेरीवाल्यांचा अडथळा पार करत प्रवाशांना रेल्वे स्थानक गाठावे लागते. किंवा रेल्वे स्थानकातून बाहेर पडणाऱ्या प्रवाशाला फेरीवाल्यांच्या धडका खात रिक्षा वाहनतळ, बाजी प्रभू चौकातील बस थांब्यावर जावे लागते, असे रेल्वे महिला प्रवासी महासंघाच्या अध्यक्षा लता अरगडे यांनी सांगितले.

याच वृत्ताची घेतली दखल – डोंबिवली स्थानकाला फेरीवाल्यांचा विळखा  

डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानक भागात एकही फेरीवाला दिसत नाही. मग पूर्व भागात ३०० मीटरच्या अंतरावर फेरीवाले का बसतात याचा विचार आयुक्त डाॅ. विजय सूर्यवंशी यांनी करावा. ग आणि फ प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त, फेरीवाला हटाव पथकातील कामगारांना फेरीवाल्यांना हटविणे जमत नसले तर त्यांच्या टिटवाळा, कल्याण पूर्व, मोहने आंबिवली भागात बदल्या करण्याची मागणी अरगडे यांनी केली.

डोंबिवली रेल्वे स्थानक भागातील फेरीवाल्यांचा प्रवाशांना होणारा उपद्रव पाहून मनसेचे शहराध्यक्ष मनोज घरत यांनी फेरीवाल्यांवर पालिकेने कठोर कारवाई केली नाहीतर मनसे स्टाईलने फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचा निर्धार व्यक्त केला होता. पालिका फेरीवाल्यांवर कारवाई करते असे म्हणत मनसेने फेरीवाल्यांकडे कानाडोळा केला. याविषयी पादचारी, स्थानिक व्यापारी नाराजी व्यक्त करत आहेत.

डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील रस्ते, पदपथ फेरीवाल्यांनी काबीज केले आहेत. पालिकेच्या ग आणि फ प्रभागातील कामगार या फेरीवाल्यांवर कारवाई करत नाहीत. पादचाऱ्यांना होणारा त्रास विचारात घेऊन ‘लोकसत्ता’ ठाणे सहदैनिकात बुधवारी ‘डोंबिवील स्थानकाला फेरीवाल्यांचा विळखा’ वृत्त देताच आज सकाळीच कामगारांनी फेरीवाल्यांना पदपथ, रस्त्यांवर बसविण्यापूर्वीच हटविले.

फ प्रभागातील एक कामगार फेरीवाल्यांना अभय देत असल्याच्या तक्रारी आहेत. या कामगाराला शिवसेनेच्या डोंबिवलीतील एका पदाधिकाऱ्याचा आशीर्वाद असल्याच सांगण्यात येते. मनसेचे मनोज घरत यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सर्व कामगारांच्या फ प्रभागातून बदल्या झाल्या. या कामगाराची फ प्रभागातून कधीही बदली केली जात नाही, असे पालिकेतील इतर कामगारांनी सांगितले. फ प्रभागातील या कामगाराच्या आयुक्त सूर्यवंशी यांच्याकडे अनेक तक्रारी आहेत. पण राजकीय दबाव येत असल्याने या कामगाराची बदली केली जात नसल्याचे समजते. रस्ते, पदपथ फेरीवाला मुक्त झाल्याने पादचारी आज समाधान व्यक्त करत होते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kdmc actions against road vendors outside dombivli railway station sgy
First published on: 25-05-2022 at 15:31 IST