कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील रस्त्यांवर उत्सव काळात मंडप, व्यासपीठ उभारण्यासाठी खोदकाम करण्यास महापालिका प्रशासनाने बंदी घातली आहे. या रस्त्यांवर मंडप उभारणीस महापालिकेने परवानगी दिली तर वाळूने भरलेले पिंप तसेच डब्यांमध्ये बांबू उभे करून मंडप उभारण्यात यावेत, अशी अट घालण्यात आली आहे. नियम मोडणाऱ्या मंडळांविरोधात कारवाई करण्याचा इशाराही पालिकेने दिला आहे.
ठाणे तसेच कल्याण-डोंबिवली परिसरात नियमांची पायमल्ली करत उत्सव साजरे करण्यात येथील मंडळे आघाडीवर आहेत. रस्ते अडवून उत्सव साजरे होत असल्यामुळे वाहतूक कोंडीतून मार्ग काढणे प्रवाशांना कठीण होऊन बसते. या पाश्र्वभूमीवर उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करत कल्याण-डोंबिवली महापालिकेने उत्सवांसंदर्भात आचारसंहिता जारी केली आहे.
कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत मंडप उभारणी, ध्वनिक्षेपक यंत्रणेची उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. पालिका हद्दीत परवानगी न घेता रस्त्यावर मंडप उभारला असेल. मोठय़ा आवाजात डीजे, ध्वनिक्षेपक लावून शांततेचा भंग करीत असेल अशा तक्रारींचा स्वीकार करण्यासाठी पालिका मुख्यालय, नागरी सुविधा केंद्र व प्रभाग क्षेत्र कार्यालयांमध्ये अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. मंडप उभारणीच्या परवानग्यांची प्रत जिल्हाधिकारी, मंडपांची परवानगी तपासणाऱ्या भरारी पथकाकडे देण्यात येणार आहे, अशी माहिती पालिका आयुक्त ई. रवींद्रन यांनी दिली.
नियमावली काय सांगते?
’मंडप, उत्सव कमान, व्यासपीठ उभारणीसाठी महिनाभर आधी परवानगी बंधनकारक
’ अर्ज दाखल केल्यानंतर तीन दिवसांच्या आत स्थानिक पोलीस प्राधीकरण, पोलीस उपनिरीक्षक, शहर वाहतूक शाखा, अग्निशमन दल यांच्याकडून ‘ना-हरकत दाखला’ मिळवणे आवश्यक.
’ तीस फुटांच्या रस्त्यावर साडेसात फुटाचा (रुंद) मंडप, ४० फुटी रस्त्यावर १० फूट रुंदीचा मंडप, ५० फूट रस्त्यावर साडेबारा फूट रुंदीचा मंडप, ६० फूट रस्त्यावर १५ फूट रुंदीचा मंडप उभारणीस परवानगी. मात्र, अंतिम निर्णय पालिका आयुक्तांच्या हाती.
’ मंजुरीविना उभारलेले मंडप पूर्वसूचना न देता हटवणार.
’ आठ फूट रुंदीच्या रस्त्यावर मंडप उभारणीस परवानगी नाही.
’ मंडप उभारणीसाठी पालिकेकडून १५ रुपये प्रति चौरस फूट दर आकारणार.
