Kalyan Dombivli Municipal Corporation Clerk Arrested For Taking Bribe: कल्याण डोंबिवली पालिकेच्या कल्याण मधील ब प्रभागातील मालमत्ता कर विभागातील लिपिक सिध्दार्थ रावसाहेब बोराडे (४९) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे पथकाने मंगळवारी संध्याकाळी संतोषी माता रस्त्यावर एका तक्रारदाराकडून सहा हजार रूपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. महापालिकेच्या ३० वर्षाच्या कारकिर्दीतील लाच घेताना सापडलेला हा ४८ वा लाचखोर कर्मचारी आहे.

कल्याण पश्चिमेतील ब प्रभागात सिध्दार्थ बोराडे मालमत्ता कर विभागात प्रभाग हद्दीतील मालमत्तांना कर लावण्याची कामे आपल्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करतात. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तक्रारीत म्हटले आहे, की याप्रकरणातील तक्रारदाराला आपण राहत असलेल्या सोसायटीच्या तळमजल्यावरील चारचाकी वाहन ठेवण्याचे वाहनतळ स्वताच्या नावावर करून घ्यायचे होते. हे वाहनतळ नावावर करून घ्यायचे असेल तर बोराडे यांनी या कामासाठी वाहन मालकाकडे १० हजार रूपये देण्याची मागणी केली होती. या कामासाठी पैसे मागितले जात असल्याने वाहन मालक अस्वस्थ होता. पैसे दिल्याशिवाय आपले काम होणार नाही याची जाणीव झाल्यावर वाहन मालकाने १७ जुलै रोजी बोराडे यांची लाचलुचपत प्रतिबंधक ठाणे विभागाकडे तक्रार केली.

पथकाने १९ जुलै रोजी या तक्रारीची सत्यता तपासून पडताळणी केली. त्यावेळी बोराडे तक्रारदार यांच्याकडे पैसे मागत असल्याचे निष्पन्न झाले. वाहन मालकाने १० हजार रूपयांची रक्कम देणे शक्य नसल्याचे बोराडे यांना सांगितले. अखेर तडजोडीने वाहन मालकाकडून सहा हजार रूपये स्वीकारण्याची तयारी लिपिक बोराडे यांनी दर्शवली. ही लाचेची रक्कम सिध्दार्थ बोराडे यांनी कल्याणमधील संतोषी माता रस्त्यावरील संत सावळा भाजी मंडई जवळील विजय सेल्स दुकानासमोरील सार्वजनिक रस्त्यावर स्वीकारण्याचे बोराडे यांनी वाहन मालकाला सांगितले. मंगळवारी संध्याकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाच स्वीकारण्याच्या भागात सापळा लावला.

ठरल्या वेळेत मंगळवारी संध्याकाळी सव्वा सहा वाजता बोराडे वाहन मालकाकडून पैसे स्वीकारण्यासाठी संत सावळा भाजी मंडई जवळ आले. वाहन मालकाने बोराडे यांच्या हातात लाचेची सहा हजार रूपयांची रक्कम देताच, पथकातील अधिकाऱ्यांनी बोराडे यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. बोराडे यांना ताब्यात घेऊन पथकाने त्यांना पालिकेच्या ब प्रभाग कार्यालयात चौकशीसाठी आणले. तेथे अधिक चौकशी केल्यावर त्यांच्यावर स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.बोराडे हे गेल्या वर्षीच वर्ग ४ संवर्गातून पदोन्नत्ती होऊन लिपिक झाले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक भारत जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.

जुलैचा मुहूर्त

कल्याण डोंबिवली पालिकेत वर्षातून दोन ते तीन कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडतात. बोराडे हे लाच स्वीकारणारे कल्याण डोंबिवली पालिकेतील ४८ वे कर्मचारी आहेत. मागील वर्षी २४ जुलै रोजी बिर्ला महाविद्यालय रस्त्यावर पालिकेतील रवींद्र अहिरे या अभियंत्याला तक्रारदाराकडून ४० हजार रूपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले होते. याच दिवशी दोन स्वच्छता अधिकारी पथकाच्या जाळ्यात लाच स्वीकारताना सापडले होते.