कल्याण : टिटवाळा सावरकर रस्त्यावरील डीजे वन चौकातील बेकायदा गाळे न तोडता, ते तोडल्याचा बनावट अहवाल पाठवून आपली दिशाभूल केली. म्हणून अतिशय उद्विग्न झालेल्या कल्याण-डोंबिवली पालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी टिटवाळा ‘अ’ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी यांच्या वाहनाची चावी आहे त्या ठिकाणाहून काढून घेऊन, त्यांना रिक्षाने प्रवास करण्याची शिक्षा द्यायची होती. चौधरी त्यांचे खासगी वाहन वापरत असल्याने आयुक्तांचा नाईलाज झाला.

जयवंत चौधरी पालिकेचे भाड्याचे वाहन वापरले असते तर मात्र गोयल यांनी चौधरी आहेत त्या स्थळी पाठवून त्यांच्या वाहनाची चावी काढून घेतली असती, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. आयुक्त गोयल यांनी साहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी यांना संपर्क करून, आपण कुठे आहात व किती वेळात आपण टिटवाळ्यातील डीजे वन चौकात येऊ शकता, असे विचारल्यावर त्यांनी दहा मिनिटांत पोहोचू , असे चौधरी यांनी उत्तरादाखल म्हटले होते.

त्यानंतर आयुक्तांनी चौधरींना पालिकेचे वाहन वापरता का, असा सवाल केला. त्यावर त्यांनी खासगी वाहन वापरत असल्याचे उत्तर आयुक्तांना दिले होते. पालिकेचे वाहन चौधरी वापरले असते, तर मात्र आयुक्तांनी त्यांच्याकडून वाहन काढून घेतले असते, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. या प्रकारानंतर आयुक्तांनी घटनास्थळीच चौधरी यांच्या निलंबनाचा आदेश काढण्याची तयारी केली. आयुक्तांनी टिटवाळा सावरकर रस्ता भागात कुठे सायबर कॅफे दिसतो का, याची चाचपणी केली. या सायबर कॅफेमध्ये बसून तेथेच चौधरी यांच्या निलंबनाचा आदेश टंकलिखित करून तो चौधरी यांच्या हातात देण्याचा आयुक्तांचा प्रयत्न होता. मात्र त्या परिसरात तशी सुविधा कुठेही आढळले नाही.

आयु्क्तांनी टिटवाळ्यातील घटनास्थळावरूनच सामान्य प्रशासन उपायुक्त वंदना गुळवे यांना आदेश देऊन पालिका मुख्यालयात पोहोचेपर्यंत जयवंत चौधरी यांच्या निलंबनाचे आदेश तयार ठेवण्याचे आदेश दिले. आयुक्त घटनास्थळी येऊन गेल्याचे समजल्यावर मग चौधरी यांनी तोडकाम पथक घेऊन त्या बेकायदा गाळ्यांच्या ठिकाणी जाऊन अतिक्रमणविरोधी कारवाई केली. तोवर आयुक्त मुख्यालयात पोहोचले व त्यांनी तातडीने चौधरी यांच्या निलंबन आदेशावर स्वाक्षरी करून केली.

मार्चपासून लक्ष

गेल्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टिटवाळा ‘अ’ प्रभागाचा पदभार स्वीकारल्यापासून साहाय्यक आयुक्त चौधरी वरिष्ठांच्या नजरेत आले होते. टिटवाळ्यातील बेकायदा बांधकामांच्या वाढत्या तक्रारी पालिकेकडे येत होत्या. या बेकायदा बांधकामांवर चौधरी कारवाई करीत नसल्याच्या या भागातील नागरिक, नगरसेवक राहुल कोट यांनी आयुक्तांकडे तक्रारी केल्या होत्या. मार्चमध्ये मालमत्ता कर वसुली करण्यात चौधरी अपयश ठरले होते. त्यावेळीही आयुक्तांनी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. आजाराच्या बहाण्याने चौधरी वैद्यकीय रजेवर गेले होते.

प्रशासनावर राजकीय दबाव टाकून ते आपली खुर्ची वाचविण्यात यशस्वी झाले होते. विधान परिषदेत टिटवाळ्यातील बेकायदा बांधकामांचा विषय चर्चेला आला. त्यावेळीच चौधरी यांच्यावर प्रशासन कारवाईचा बडगा उगारणार होते. परंतु, त्यावेळीही पालिकेतील एका सर्वाेच्च पदाधिकाऱ्याने हस्तक्षेप करून ही कारवाई रोखली, अशी चर्चा होती. नोकरीची दोन वर्षे शिल्लक असताना चौधरी निलंबित झाले. टिटवाळ्यातील बेकायदा बांधकामांवरून निलंबित झालेले चौधरी दुसरे अधिकारी आहेत.