राज्यात सरकारने टप्प्याटप्प्याने अनलॉकची प्रक्रिया सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरातील जिल्हे आणि स्वतंत्र प्रशासकीय गट म्हणून वर्गीकरण झालेल्या महानगर पालिका यांचं ५ टप्प्यांमध्ये वर्गीकरण करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेचा समावेश तिसऱ्या टप्प्यामध्ये करण्यात आला आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या आणि मृतांचा आकडा देखील खाली येत असताना कल्याणमध्ये रुग्णसंख्या आणि मृतांची संख्या काहीशी स्थिर दिसून येत आहे. कल्याणमध्ये देखील नव्या नियमावलीनुसार दुकानं उघडण्याची मुभा देण्यात आली आहे. आजच्या आकडेवारीनुसार कल्याण-डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रामध्ये ११३ नवे करोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे कालपेक्षा ही संख्या कमी झाल्याचं दिसत असून यामुळे कल्याण-डोंबिवलीकरांना दिलासा मिळाला आहे.

कल्याण-डोंबिवलीमध्ये आज दिवसभरात आढळलेल्या ११३ करोनाबाधितांमुळे पालिका क्षेत्रात सद्यघडीला उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या १६८५ इतकी झाली आहे. तर आज दिवसभरात कल्याण-डोंबिवलीमध्ये एकूण ३१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे एकूण डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ३० हजार ५६३ इतकी झाली आहे.

कल्याण-डोंबिवलीमध्ये आज सापडलेल्या रुग्णांच्या आकडेवारीनुसार, कल्याण पूर्वमध्ये २०, कल्याण पश्चिममध्ये २६, डोंबिवली पूर्वमध्ये २८, डोंबिवली पश्चिममध्ये २२ तर मांडा टिटवाळामध्ये १७ नवे करोनाबाधित सापडले आहेत. गुरुवारी कल्याण-डोंबिवलीमध्ये १७२ करोनाबाधित सापडले होते. त्याशिवाय ६ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली होती. त्यामुळे या दोन्ही बाबतीत आजची आकडेवारी निश्चितच घट दाखवणारी ठरली आहे.

 

अनलॉकला आठवडा पूर्ण! जिल्हानिहाय नवी आकडेवारी जाहीर! सर्वाधिक पॉझिटिव्हिटी रेट कोल्हापूरचा

राज्य सरकारने गुरुवारी राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील पॉझिटिव्हिटी रेट आणि तेथील ऑक्सिजन बेड ऑक्युपन्सीची आकडेवारी जाहीर केली आहे. त्या आधारावर आता जिल्हा प्रशासन आणि पालिका प्रशासन स्थानिक पातळीवर निर्णय घेऊन संबंधित जिल्हा किंवा पालिकेचा कोणत्या गटामध्ये समावेश होऊ शकतो आणि त्यानुसार निर्बंधांमध्ये वाढ किंवा घट करता येईल का? यासंदर्भात पावलं उचलतील.