कल्याण : कल्याण-डोंबिवली पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांशी संगनमत करून खोट्या कागदपत्रांच्या आधारे २७ गावांतील मौजे दावडी, नांदिवली परिसरातील १० व्यक्तींचे बनावट मृत्यू दाखले तयार करण्यात आल्याचा आरोप भाजपचे नगरसेवक जालिंदर पाटील, नगरसेवक ॲड. मंदार टावरे यांनी साक्षीपुराव्याने पालिकेच्या महासभेत केल्याने खळबळ उडाली आहे. पालिका प्रशासनाला सादर केलेले हे बनावट दाखले तात्काळ रद्द करून ते तयार करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावी, अशी मागणी या नगरसेवकांनी केली.
कल्याण-डोंबिवली पालिकेत मृत्यू दाखला देताना मृत व्यक्तींच्या नातेवाईकांकडून सादर केलेली कागदपत्रे तपासली जातात की नाही. मृत्यूचे ठिकाण, स्थानिक डाॅक्टरचे मृत्यू प्रमाणपत्र, पंच, साक्षीदार यांच्या स्वाक्षऱ्या मृत्यू दाखला मिळविण्यासाठी कागदपत्रांसोबत जोडलेले असते की नाही, असे सवाल करीत या सर्व प्रक्रियेत संबंधित वैद्यकीय अधिकारी, पंचनामा करणारी व्यक्ती सामील असल्याचा संशय नगरसेवक ॲड. मंदार टावरे यांनी व्यक्त केला. या सर्व मृत्यू दाखला प्रकरणाची प्रशासनाने चौकशी करावी. यात जे दोषी आढळतील त्यांच्यावर फौजदारी कारवाईची मागणी केली.
भाजपचे नगरसेवक जालिंदर पाटील यांनी महासभेत सांगितले, की २७ गावांतील दावडी भागातील १० मृत व्यक्तींचे दाखले हे बनावट कागदपत्रे, खोट्या संशयास्पद पंचनाम्याच्या आधारे देण्यात आले आहेत. या सर्व प्रक्रियेत मोठा गैरव्यवहार झाला आहे. या सर्व गैरप्रकारची कागदपत्रे आपण महासभेत सादर करत आहोत, असे सांगताच महासभेत गोंधळ उडाला.
आपल्याजवळ काही मृत्यू दाखले आहेत. हे दाखले मिळविण्यासाठी सादर केलेल्या कागदपत्रांवर स्थानिक रहिवाशांच्या स्वाक्षऱ्या असणे आवश्यक होते. परंतु, या कागदपत्रांवर टिटवाळा, डोंबिवली, कल्याण शहराच्या विविध भागातील नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. स्थानिक मृत व्यक्तीला स्थानिक रहिवासी, नातेवाईक ओळखतो. त्यांच्या स्वाक्षऱ्या या कागदपत्रांवर नाहीत, असे नगरसेवक जालिंदर पाटील यांनी सांगितले.
आठ व्यक्तींचे अंत्यसंस्कार पालिकेच्या नांदिवली स्मशानभूमीत करण्यात आले आहेत, असे दर्शविण्यात आले आहे. प्रत्यक्षात अशाप्रकारचे अंत्यसंस्कार या स्मशानभूमीत करण्यात आले नाहीत, असे पत्र स्थानिक पोलीस पाटील यांनी दिले आहे. कल्याण पूर्व भागातील मलंगगड रस्ता भागातील एकाच डाॅक्टरने संबंधित व्यक्ती मृत झाल्याची प्रमाणपत्रे दिली आहेत. त्यामुळे याठिकाणीही संशय घेण्यास वाव आहे. त्यामुळे या सर्व मृत्यू दाखले प्रकरणाची चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवक जालिंदर पाटील, ॲड.मंदार टावरे यांनी प्रशासनाकडे केली. पालिका प्रशासनाने याप्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन महासभेला दिले.
एखादी व्यक्ती २० वर्षापूर्वी मरण पावली. त्याच्या नावाने आता आडनाव, नाव बदलून नव्याने मृत्यू दाखले तयार करण्यात आले आहेत. मृत्यू ठिकाण, मृत्यू प्रमाणपत्र देणारा डाॅक्टर, अंत्यसंस्कार करण्यात आलेली स्मशानभूमी यांचा कागदोपत्री कुठेही ताळमेळ नाही. कल्याण पूर्वेतील एका खासगी डाॅक्टरने आपण एका इसमाच्या सांगण्यावरून ही मृत्यू प्रमाणपत्र दिल्याची कबुली त्यांच्याच शीर्षकपत्रावर दिली आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराला पालिकाही तेवढी जबाबदार आहे, असे नगरसेवक ॲड. टावरे यांनी सांगितले. या सर्व प्रकाराने बनावट मृत्यू दाखले तयार करणारी एक टोळी कल्याण डोंबिवलीत सक्रिय असल्याचा संशय सर्व पक्षीय नगरसेवकांनी व्यक्त केला.
