डोंबिवली : डोंबिवलीतील सावळाराम महाराज क्रीडा संकुलातील क्रिकेट खेळपट्टय़ा निविदा प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच महापालिकेने एका खासगी क्रिकेट प्रशिक्षण संस्थेकडे दिल्याने डोंबिवलीतील क्रिकेट प्रशिक्षण संस्था चालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

डोंबिवलीतील सावळाराम महाराज क्रीडा संकुलात चार क्रिकेट खेळपट्टय़ा आहेत. या खेळपट्टय़ांवर डोंबिवली शहर परिसरातील क्रिकेटचे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना क्रिकेट प्रशिक्षण संस्थांकडून प्रशिक्षण दिले जाते. दीड वर्षांपूर्वी डोंबिवलीतील ‘बॉइज क्रिकेट क्लब’चे राजन धोत्रे यांनी या खेळपट्टय़ा पालिकेच्या सहकार्याने विकसित केल्या. करोना महामारीमुळे दीड वर्षांत सर्व व्यवहार ठप्प असल्याने नव्याने विकसित केलेल्या खेळपट्टय़ांवर मुलांना क्रिकेटचे धडे देणे कोणत्याही क्रिकेट प्रशिक्षण संस्थेला जमले नव्हते.

डोंबिवली क्रीडा संकुलातील क्रिकेट खेळपट्टय़ा प्रशिक्षणासाठी उपलब्ध करून द्याव्यात म्हणून डोंबिवलीतील क्रिकेट प्रशिक्षण संस्थांनी पालिका प्रशासनाकडे मागणी केली होती. अधिकाऱ्यांनी निविदा प्रक्रिया राबवून स्पर्धात्मक पद्धतीने क्रिकेट खेळपट्टय़ा क्रिकेट संस्थांना देण्यात येतील, असे उत्तर महापालिकेच्या संबंधित विभागाने या संस्थांना दिले होते. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सावळाराम महाराज क्रीडा संकुलातील क्रिकेट खेळपट्टय़ांवर क्रिकेट प्रशिक्षण सुरू होणार असल्याचे फलक डोंबिवली जिमखाना, घरडा सर्कल भागात कल्याणमधील एका खासगी क्रिकेट प्रशिक्षण संस्थेने लावले आहेत.

 निविदा प्रक्रिया पालिकेने पूर्ण केली नसताना अचानक क्रीडा संकुलातील खेळपट्टय़ांवर क्रिकेट प्रशिक्षण वर्ग सुरू होण्याचे फलक शहरात झळकू लागल्याने प्रशिक्षण संस्थांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

क्रीडा संकुलातील चारही खेळपट्टय़ा आपण विकसित केल्या आहेत. त्या प्रशिक्षणासाठी द्याव्यात म्हणून आपण पालिका अधिकाऱ्यांशी बोललो. निविदा प्रक्रिया पूर्ण करून या खेळपट्टय़ांचे वाटप केले जाईल असे सांगण्यात आले. आता त्या ठिकाणी खासगी प्रशिक्षण संस्थेने कसा काय प्रशिक्षणाचा फलक लावला. हा इतर प्रशिक्षण संस्थांवर अन्याय आहे.

– राजन धोत्रे, बॉइज क्रिकेट क्लब, डोंबिवली.\

सावळाराम क्रीडा संकुलातील खेळपट्टय़ा निविदा प्रक्रियेतून क्रिकेट संस्थांना देण्यात येणार आहेत. ही निविदा प्रक्रिया सुरू आहे. प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत खेळपट्टय़ा पडून राहू नयेत म्हणून वरिष्ठांनी एका खासगी संस्थेला तात्पुरत्या स्वरूपात तेथे प्रशिक्षण घेण्यास परवानगी दिली आहे. निविदा प्रक्रियेतून संस्था निवड होताच तात्पुरत्या संस्थेला प्रशिक्षण थांबवण्यास सांगितले जाईल.

– पल्लवी भागवत, उपायुक्त, मालमत्ता विभाग, महापालिका