कल्याण – कल्याण डोंबिवली पालिकेची डोंबिवलीतील शास्त्रीनगर, कल्याणमधील रुक्मिणीबाई रुग्णालये रुग्ण सेवेतील त्रृटी, रुग्णांबरोबर डाॅक्टर, परिचारिका, कर्मचाऱ्यांचे उर्मट वागणे, रुग्णालयातील अनागोंदी कारभार आणि असुविधा अशा विविध कारणांमुळे मागील दोन वर्ष चर्चेत आहेत. या सर्व प्रकाराने पालिका रुग्णालये सतत बदमान होत असल्याने, अखेर जाग आलेल्या पालिका प्रशासनाने या रुग्णालयांमध्ये १२ ते १५ वर्ष एकाच रुग्णालयात, एकाच पदांवर ठाण मांडून बसलेल्या संस्थानिक, ठाणमांड्या वैद्यकीय अधिकारी यांच्या दोन दिवसापूर्वी बदल्या केल्या.

दोन वर्षापासून रुग्ण सेवेतील विविध प्रकारच्या त्रृटीमुळे पालिका रुग्णालये बदनाम होत आहेत. शासन स्तरावर या रुग्णालयातील गैरप्रकार, अनागोंदीची दखल घेतली जात होती. एवढी परिस्थिती असताना पालिका प्रशासन या रूग्णालयातील ज्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांमुळे ही रुग्णालये बदनाम होत आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी वैद्यकीय आरोग्य विभाग या गैरकारभारी वैद्यकीय अधिकाऱ्यांची पाठराखण करून कंत्राटी डाॅक्टर, कर्मचाऱ्यांचे बळी देत असल्याने पालिका प्रशासनात याविषयी तीव्र नाराजी होती.

अनागोंदीचा कहर

आपण पालिका रुग्णालयात काहीही केले तरी आपल्यावर कारवाई होत नाही याची जाणीव झाल्याने शास्त्रीनगर, रुक्मिणीबाई रुग्णालयातील काही वैद्यकीय अधिकारी रुग्णालयात संस्थानिक असल्यासारखे मनमानी पध्दतीने वागत होते. रात्रपाळीचे कर्तव्य असेल तर हे संस्थानिक डाॅक्टर कर्तव्यावर अनेक वेळा हजर नसायचे. शास्त्रीनगर रुग्णालयात नगरसेवक रमेश म्हात्रेकडून डाॅक्टरला मारहाण होत असताना एक संस्थानिक वैद्यकीय अधिकारी उपस्थित होता, त्यावेळी तो इतर वैद्यकीय कक्षात दडून बसला होता.

रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या शस्त्रक्रिया गृहाचा रात्री बारा वाजल्यानंतर काही डाॅक्टर गैरवापर करत होते. याविषयी कर्मचारी तीव्र नाराजी व्यक्त केली जात असताना, नियंत्रक संस्थानिक डाॅक्टर त्याकडे कानाडोळा करत होते, अशा तक्रारी आहेत. खंबाळपाडा येथील दोन मुलींचा शास्त्रीनगर रुग्णालयात मृत्यू झाला. त्यादिवशी रात्रपाळीतील संस्थानिक डाॅक्टर कर्तव्य असुनही त्या दिवशी गैरहजर होता. पालिका वरिष्ठांनी काही महिन्यापूर्वी शास्त्रीनगर रुग्णालयाची मध्यरात्रीच्या सुमारास अचानक पाहणी केली. त्यावेळीही रात्रपाळीत संस्थानिक डाॅक्टर कर्तव्यावर हजर नव्हता. या सर्व प्रकारांची पालिकेच्या वरिष्ठांनी संबंधितांची नेहमीच पाठराखण केली. वैद्यकीय आरोग्य विभागाच्या प्रमुख ‘मी बाई प्रामाणिक, बाहेर तुम्ही काही करा’ अशा हेक्याने काम करत असल्याने वैद्यकीय आरोग्य विभागात सर्वाधिक अनागोंदी माजली, अशी चर्चा आहे.

वैद्यकीय विभागावर कोणाचे प्रभावी नियंत्रण नसल्याने हा विभाग, त्यांच्या नियंत्रणाखालील रुग्णालये दररोज बदनाम होत गेली. अखेर आयुक्त अभिनव गोयल या रुग्णालयातील निष्क्रिय वैद्यकीय सेवा, कर्मचारी, डाॅक्टर, रुग्णवाहिका चालकांची मनमानी, संस्थानिक आणि परिसरातील औषध विक्रेते, प्रयोगशाळा, खासगी डाॅक्टरांशी, स्वताची खासगी रुग्णालयांशी असलेले स्नेहसंबंध, श्वान दंशाचे वाढते प्रकार यामुळे त्रस्त होते. या रुग्णालयांची कठोर साफसफाई

केल्या शिवाय ही अनगोंदी कमी होणार नाही, असा विचार करून आयुक्तांनी या रुग्णालयांमधील संस्थानिक डाॅक्टरांच्या अन्यत्र बदल्या केल्या. पालिकेची रुग्णालये, रुग्णसेवा सुदृढ करण्यापेक्षा आरोग्य विभागाच्या निविदा, टक्केवारीतून स्वताचे घर सुदृढ करणारे काही संस्थानिक मात्र यामधून सुटल्याची चर्चा आहे.

डाॅक्टर बदल्या

रुक्मिणीबाई रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डाॅ. पराग पाडवी, डाॅ. विजय कुवर, डाॅ. संदीप पगारे यांची डोंबिवलीत शास्त्रीनगर रुग्णालयात, शास्त्रीनगर रुग्णालयातील डाॅ. संतोष केंभावी, डाॅ. प्रशांत चौधरी, डाॅ.कविता मढवी-वंटमुरी याची कल्याण येथील रुक्मिणीबाई रुग्णालयात बदली करण्यात आली आहे. शास्त्रीनगर रुग्णालयातील डाॅ. विनोद दौंड यांची पालिका आरोग्य मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. अनेक वर्ष साथरोग नियंत्रण अधिकारी असलेल्या डाॅ. प्रतिभा पानपाटील यांची मढवी आरोग्य केंद्रातून शास्त्रीनगर रुग्णालयात बदली करण्यात आली आहे. करोना काळात उत्तम कामाचे कौतुक झालेल्या आणि इतरवेळीही आरोग्य विभागाचे सर्व आरोग्य उपक्रम पूर्ण क्षमतेने राबविणाऱ्या कर्तव्यदक्ष वैद्यकीय अधिकारी डाॅ. पौर्णिमा ढाके यांना पुन्हा मढवी आरोग्य केंद्रात पदस्थापना देण्यात आली आहे. आयुक्त गोयल यांनी आपल्या स्वाक्षरीने प्रशासकीय सोयीसाठी हा बदली आदेश काढला आहे.