कल्याण – कल्याण डोंबिवली पालिकेची कल्याणमधील बाई रुक्मिणीबाई रुग्णालय, गौरीपाडा येथील रुग्णालय आणि पूर्वेतील कोळसेवाडी येथील शक्तिधाम अशी तीन रुग्णालये सात वर्षाच्या कालावधीसाठी अंबरनाथ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नित करण्याचा निर्णय पालिका प्रशासन आणि वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने सामंजस्य कराराने घेतला आहे. या संलग्नतेमुळे पालिका रुग्णालयांमध्ये मुबलक मनुष्यबळ उपलब्ध होऊन रुग्णांना तत्पर दर्जेदार वैद्यकीय सुविधा मिळणे शक्य होणार आहे.
नवीन वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी, लोकांच्या आरोग्याशी संबंधित हा महत्वपूर्ण विषय नगरसेवकांच्या विळख्यात अडकू नये म्हणून पालिकेत लोकप्रतिनिधी राजवट सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला हा महत्वपूर्ण विषय प्रशासनाने मंजूर केला. यापूर्वीचे रुग्णालयाशी संबंधित विषय नगरसेवकांनी महासभेत घेतलेल्या उलटसुलट भूमिकांमुळे बारगळले आहेत.
महाविद्यालय उभारणी
शासनाने जुलै २०२३ मध्ये ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमध्ये १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय महाविद्यालय आणि या महाविद्यालयाला संलग्नित ४३० खाटांचे रुग्णालय उभारणीस मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डाॅ. श्रीकांंत शिंदे यांचे अंबरनाथ येथील वैद्यकीय महाविद्यालय, त्याला संलग्नित रुग्णालय मंजुर आणि आणण्यात महत्वाचा वाटा आहे. अंबरनाथ येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले असले तरी त्याला संलग्नित रुग्णालय नाही. या रुग्णालयाची उभारणी होणे बाकी आहे.
अंबरनाथ येथील वैद्यकीय रुग्णालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रुग्ण सेवेचा अभ्यास आणि वैद्यकीय उपचारांचे प्रात्यक्षिक घेण्यासाठी अंबरनाथ येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची उभारणी होईपर्यंत किमान सात वर्षासाठी कल्याण डोंबिवली पालिकेची कल्याण मधील रुक्मिणीबाई रुग्णालय, गौरीपाडा रुग्णालय आणि शक्तिधाम रुग्णालय सामंजस्य कराराव्दारे विद्यार्थी वापरा करता हस्तांतरण करण्यासाठी अंबरनाथ येथील शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांंनी पालिकेकडे मागणी केली होती. महाविद्यालय इमारत वेळेत उभी राहिली तर त्या अगोदरही पालिका रुग्णालय वापरण्याची संलग्नता संपविण्याचा विचार महाविद्यालय प्रशासनाकडून करण्यात येणार आहे.
रुग्णालयात सुविधा
रुक्मिणीबाई रुग्णालयात प्राधान्य तत्वावर अति दक्षता विभाग सुरू करण्यासाठी अंबरनाथ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्रयत्न केले जाणार आहेत. महाविद्यालयाच्या आस्थापनेवर आवश्यक अध्यापक, तांत्रिक, अतांत्रिक अधिकारी, कर्मचारी वर्ग उपलब्ध झाल्यानंतर कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा येथील रुग्णालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून ताब्यात घेण्यात येणार आहे. शक्तिधाम येथील इमारतीच्या आरक्षण बदलाचा विषय मार्गी लागल्यावर हे रुग्णालय महाविद्यालयाकडून ताब्यात घेण्यात येणार आहे. यासंदर्भातचा प्रशासकीय ठराव आयुक्त अभिनव गोयल, पालिका सचिव किशोर शेळके यांच्या स्वाक्षरीने करण्यात आला आहे. ही रुग्णालये महाविद्यालयाकडे हस्तांतरित झाल्यानंंतर पालिका रुग्णालयातील वैद्यकीय आणि इतर कर्मचाऱ्यांच्या सेवा कोठे वर्ग केल्या जातील. या माध्यमातून पालिकेला कोणता लाभ होणार, असे प्रश्न नगरसेवकांकडून उपलब्ध केले जात आहेत.
मागील २५ वर्षापूर्वी माजी आयुक्त डाॅ. श्रीकांत सिंग यांच्या काळात नवी मुंबईतील वैद्यकीय रुग्णालयातील अनेक प्रशिक्षणार्थी डाॅक्टर कडोंमपा रुग्णालयात सेवा देत होते.
पालिका आयुक्त आणि शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठता यांच्यात रुग्णालय हस्तांंतरणाचा सामंजस्य करार झाला आहे. अत्यावश्यक सुविधा पालिका रुग्णालयांमध्ये या माध्यमातून उभारल्या जाणार आहेत. सात वर्षाचा हा करार आहे. – डाॅ. दीपा शुक्ल वैद्यकीय आरोग्य अधिकारी.

