कल्याण – कल्याण डोंबिवली पालिकेची निवडणूक पार पडल्यावर मागील नऊ दिवसांपासून अज्ञातवासात असलेल्या शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या नगरसेवकांचा मुक्काम मुंबई नाशिक महामार्गावरील इगतपुरी येथे आहे. गुरूवारी रात्री उशिरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी या हाॅटेलला भेट दिली. यावेळी हाॅटलेसह परिसरात विवाह सोहळ्यासारखी विद्युत रोषणाई, सजावट करण्यात आली होती. या भेटीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांशी संवाद साधून पालिका कारभाराविषयी मार्गदर्शन केले असल्याचे समजते.
शुक्रवार, आजपासून महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पालिकेत शिवसेनेचे संख्याबळ ५३ आहे. ठाकरे गटाचे चार नगरसेवक बेपत्ता आहेत. हे नगरसेवक शिवसेना शिंदे गटाच्या रखवालीत असल्याची चर्चा असून ते शिवसेना शिंदे गटाला स्वतंत्र गट तयार करून पाठिंबा देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याशिवाय मनसेच्या नऊ नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे पालिका सभागृहात शिवसेना शिंदे गटाचे एकूण संख्याबळ ६६ आहे.
भाजपचे संख्याबळ ५० आहे. परंतु, भाजपने कोकण विभागीय आयुक्तांकडे नवनिर्वाचित भाजप नगरसेवकांची नोंदणी करताना भाजप विकास आघाडी या नावाने गट स्थापन केला आहे. त्यामुळे आयत्यावेळी भाजपकडून शिवसेना शिंदे गटाला गुंगारा दिला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
इगतपुरी भेट
कोणाच्याही फोडाफाडीला आपल्या पक्षाचे नगरसेवक गळाला लागू नये म्हणून नगरसेवकांच्या सुरक्षिततेचा विचार करून शिवसेना शिंदे गटाने गेल्या गुरूवारी आपल्या ५३ नगरसेवकांना इगतपुरी परिसरातील मानस हाॅटेल मागील निबिड जंगलातील एका हाॅटेलमध्ये एकत्रितरित्या मुक्कामासाठी ठेवले आहे. या नगरसेवकांभोवती भक्कम तटबंदी आहे. त्यांचे मोबाईल बंद आहेत. या नगरसेवकांच्या सोबत ठाकरे गटाचे चार बेपत्ता नगरसेवक असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
गेल्या आठवड्यापासून आपले नगरसेवक इगतपुरी मुक्कामी एका हाॅटेलमध्ये आपल्या कुटुंबापासून दूर राहत असल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी गुरूवारी रात्री उशिरा या हाॅटेलला भेट दिली. आपले पक्षप्रमुख येणार म्हणून हाॅटेल परिसराला विद्युत रोषणाई करण्यात आली होती. एखाद्या लग्न सोहळ्याचा थाट याठिकाणी करण्यात आला होता. मोठी मेजवानी नवनिर्वाचित नगरसेवकांना यावेळी देण्यात आली. आमदार राजेश मोरे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांच्यावर ही जबाबदारी आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापौर निवडीसंदर्भात पक्षाची भूमिका, महापौर पदाचा उमेदवार आणि सभागृहात नगरसेवकांनी घ्यायची भूमिका याविषयी मार्गदर्शन केल्याचे समजते.
कुटुंबापासून दूर असल्याने नवनिर्वाचित नगरसेवक विशेषता महिला नगरसेविका हाॅटेल मुक्कामी कंटाळल्या असल्याची चर्चा आहे. आपला व्यवसाय, वकिली पेशाची कामे सोडून मागील नऊ दिवसांपासून हाॅटेलमध्ये बंदिस्त राहावे लागल्याने नगरसेवकांमधील व्यावसायिक मंडळी त्रस्त असल्याचे समजते.

