कल्याण – कल्याण डोंबिवली पालिका महापौर निवडीच्यावेळी मंगळवारी उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नऊ नगरसेवकांपैकी तीन नगरसेवक अनुपस्थित होते. बेपत्ता नगरसेवकांमधील ॲड. कीर्ति ढोणे या सभागृहात उपस्थित राहून ठाकरे गटात बसल्या होत्या. तीन बेपत्ता नगरसेवकांनी मंगळवारी पक्षाने सभागृहात उपस्थितीचा आदेश बजावुनही तो जुमानला नाही. त्यामुळे त्यांच्यावर पक्ष आदेश आणि शिस्तीचा भंग म्हणून कारवाई केली जाईल. यासंदर्भात ठाकरे गटाने त्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. त्यांचे खुलासे आल्यानंतर योग्य निर्णय घेऊ, असे उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण डोंबिवली पालिकेतील गटनेते उमेश बोरगावकर यांनी सांगितले.

या तीन नगरसेवकांपैकी दोन नगरसेवक राजीनामा देणार असल्याची कुजबुज आमच्या कानावर आली आहे. ते दोन नगरसेवक कोण, हे मात्र गटनेते बोरगावकर यांनी सांगण्यात नकार दिला. ठाकरे गटाचे गटनेते उमेश बोरगावकर यांच्या नेतृत्वाखाली सहा नगरसेवक सभागृहात उपस्थित होते. मागील सोळा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ॲड. कीर्ति ढोणे यांनीही सभागृहात उपस्थिती लावून ठाकरे गटात बसणे पसंत केले. या हालचालींमुळे ॲड. ढोणे यांनी आपल्यावरील पक्ष शिस्तभंग कारवाई टाळल्याची चर्चा आहे.

मधुर म्हात्रे अनुपस्थित

ठाकरे गटाचे कल्याणमधील नगरसेवक मधुर म्हात्रे मागील सोळा दिवसांपासून बेपत्ता होते. ते देवदर्शनाला गेले आहेत, असे त्यांचे वडील उमेश म्हात्रे यांनी माध्यमांना सांगितले होते. दोन दिवसापूर्वी रात्रीच्या वेळेत वाजतगाजत बेपत्ता नगरसेवक मधुर म्हात्रे आपल्या घरी परतले. ते महापौर निवडणुकीसाठी सभागृहात येतील असे चित्र होते. पण, नगरसेवक मधुर म्हात्रे हे शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक महेश गायकवाड यांचे खंदे समर्थक आहेत. पालिका निवडणुकीत विजयी झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मधुर म्हात्रे यांनी महेश गायकवाड यांच्या साथीने खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली होती. त्यामुळे मधुर म्हात्रे शिवसेना शिंदे गटाची साथ धरतील अशी चर्चा सुरू झाली होती. अखेर ती त्यांच्या सभागृहातील अनुपस्थितीने खरी ठरली आहे.

ढोणे देवदर्शनासाठी

मागील सोळा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ॲड. कीर्ति ढोणे यांनी आपण देवदर्शनासाठी गेले होते. आपण बेपत्ता वगैरे नव्हतो. आपण पक्ष वरिष्ठांच्या संपर्कात होतो. आपली बाजू आपण पक्षाच्या वरिष्ठांकडे मांडली आहे. आपली तब्येत ठीक नाही. त्यामुळे योग्यवेळी आपण आपली बाजू माध्यमांसमोर मांडणार आहोत, असे ॲड. ढोणे यांनी सांगितले.

राजीनामा तयारी

ठाकरे गटाच्या चिन्ह आणि पक्षाच्या नावे निवडून आलेले कल्याणमधील दोन नगरसेवक राजीनामा देणार आहेत, अशी कुजबुज आमच्या कानावर आली आहे. ते दोन नगरसेवक कोण. त्यांची नावे मी सांगू शकत नाही. या नगरसेवकांना आम्ही कारणे दाखवा नोटिसा पाठविल्या आहेत. त्यांनी त्यांचे खुलासे योग्य करायचे आहेत. खुलाशानंतर आम्ही त्यांच्यावर पक्ष शिस्तभंगाची कारवाई करणार आहोत. योग्यवेळी हा निर्णय घेतला जाईल, असे ठाकरे गटाचे गटनेते उमेश बोरगावकर यांनी सांगितले.