कल्याण – कल्याण डोंबिवली पालिका हेच काही ठेकेदार, नगरसेवकांच्या उपजीविकेचे साधन आहे. या ठेकेदार, नगरसेवकांनी यापूर्वी खुलेआमपणे आमची उपजीविकाच पालिकेवर अवलंबून असल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. असे मागील सहा वर्षापासून अडगळीत असलेले गटार, पायवाटा, सार्वजनिक शौचालय, मुतारींची कामे घेणारे ठेकेदार पालिकेत नगरसेवक राजवट सुरू होताच, पुन्हा हातात आपल्या कामांच्या नस्ती घेऊन महापौर दालनाबाहेर उभे असल्याचे चित्र दिसू लागले आहे.
नवनिर्वाचित महापौर, उपमहापौरांना आमच्या ताकदीने आम्ही महापौर, उपमहापौर पदावर बसविले आहे, अशा अविर्भावात हे ठेकेदार महापौर दालनाच्या बाहेर उभे असल्याचे दिसून येत आहे. महापौर, उपमहापौर कार्यालयांबाहेर या दोन्ही पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देण्यासाठी नागरिक, शहराच्या विविध क्षेत्रातील मान्यवर यांची वर्दळ आहे. अशा वर्दळीत सार्वजनिक शौचालय, मुतारी, गटार, पायवाटा उभारणीची कामे करणारे हे ठेकेदार विकास कामांच्या नस्ती घेऊन त्या वर्दळीत वावरत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. या उपजीवी ठेकेदारांना महापौर कार्यालयाबाहेर किती किंमत दिली जाते यावर या पालिका आणि ठेकेदारांचे भवितव्य अवलंबून असल्याचे पालिकेत चर्चा आहे.
कारभारी गायब
महापौर ॲड. हर्षाली चौधरी-थविल या स्वता वकील, उच्चशिक्षित आहेत. विकास कामे, नागरी समस्यांचा त्यांना अभ्यास आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंंदे, खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने त्या महापौर पदी विराजमान झाल्या आहेत. त्यामुळे स्थानिक शिवसेना शिंदे गटाचा एकही पदाधिकारी महापौर ॲड. हर्षाली चौधरी महापौरपदी विराजमान झाल्यानंतर अवतीभवती मिरवत नसल्याचे पालिकेतील चित्र आहे. यापूर्वी बहुतांशी महापौरांच्या बाजुला ‘कारभारी’ बसून पालिकेचा गाडा चालवित होते. त्यामुळे यापूर्वी महापौरांच्या दालनाबाहेर नागरी समस्या, विकासापेक्षा बेकायदा बांधकामे करणारे भूमाफिया, ठेकेदार, विकासक यांचा गराडा पडलेला असायचा. ते चित्र आता किती दिसणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत. महापौर ॲड. चौधरी स्वता उच्चशिक्षित आहेत. त्यामुळे त्या ‘कारभारी’ विषयाला फार दाद देणार नसल्याची चर्चा आहे.
कारभारी नाराज
आपल्याच मनातील महापौर पालिकेत बसावा म्हणून शिवसेना शिंदे गटातील एक पदाधिकारी खूप आग्रही होता. पण या पदाधिकाऱ्याच्या मताला शिवसेनेच्या नेत्यांनी फार मानले नाही. आणि पक्ष नेत्यांच्या मनातील महापौर कल्याण डोंबिवली पालिकेच्या महापौरपदी विराजमान केला. या पदाधिकाऱ्याच्या मनातील महापौर विराजमान झाला असता तर मात्र पालिकेत कारभारी महापौराचे राज्य सुरू झाले असते अशी चर्चा पालिकेत आहे. खासदार डाॅ. शिंदे यांनी ही खेळी ओळखून स्वमनाने काम करणाऱ्या महापौर पालिकेच्या विराजमान केल्याचे समजते.

