डोंबिवली : पालिकेच्या सर्वसाधारण सभेत एखादा विषय मांडताना अभंगाच्या दोन ओळी म्हणून दाखविणे. आणि त्या अनुषंगाने एखादा विषय मांडणे हे काही कीर्तन, प्रवचन करण्यासारखे नाही. राज्य विधीमंडळाच्या सभागृहात मंत्री, आमदार नियमित अभंग, कबिराचे दोहा, शेर ऐकून विषयाला सुरुवात करतात. राज्याचा, पालिकांचा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री, पालिका आयुक्त समयोचित अभंगाच्या ओळी, दोहा, शेर सादर करून मग अर्थसंकल्प सादर करतात. त्यामुळे आपणास महासभेत अभंग बोलण्यास नाकारून आपण संत श्रेष्ठांचा अपमान केला आहे, अशी खंत व्यक्त करणारे पत्र मनसेचे डोंबिवलीतील नगरसेवक, अध्यात्मिक प्रल्हाद म्हात्रे यांनी महापौर ॲड. हर्षाली चौधरी यांना दिले आहे.

महाराष्ट्राला थोर संतांची परंपरा आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी भक्ती आणि अद्वैत तत्त्वज्ञान यांच्या माध्यमातून ज्ञानेश्वरी आणि पसायदान दिले. संत तुकाराम महाराजांनी आपल्या गाथेच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन आणि रोकठोक विचार मांडले. संत एकनाथ महाराजांनी भारुडे आणि गवळणीच्या माध्यमातून लोकजागृती केली. संत नामदेव महाराजांनी अभंग रचना – कीर्तनाच्या माध्यमातून भारतभर प्रसार केला. संत चोखामेळा किंवा संत गोरोबा यांनी भक्तीच्या माध्यमातून श्रमाला प्रतिष्ठा मिळवून दिली. संत गाडगे महाराजांनी अभंगाच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश देऊन जनजागृती केली. या थोर संतांचे कार्य आणि त्यांचे विचार आजच्या आधुनिक काळात देखील उपयोगी ठरता. या थोर संतांचे विचार अभंगाच्या एक दोन ओळीतून मांडण्यास आपण मला विरोध केला, त्यामुळे हा माझा अपमान झाला नाही. आपण थोर संतांच्या अभंगाला विरोध करून संत श्रेष्ठांचा अपमान केला आहे, असे नगरसेवक प्रल्हाद म्हात्रे यांनी पत्रात म्हटले आहे.

भाषणात संत साहित्याचा संदर्भ

अनेक महापालिका, विधानसभा आणि विधान परिषदेच्या सभागृहात अनेक सदस्यांनी – विचारवंतानी आपल्या भाषणात संत साहित्याचा संदर्भ देत आपले विचार मांडले आहेत. उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांनी २८ जून २०२४ रोजी राज्याचा अर्थसंकल्प मांडताना संत तुकाराम महाराजांचा अभंग म्हणाले.

निंदी कोणी मारी । वंदी कोणी पूजा करी ॥१॥मज हें ही नाहीं तें ही नाहीं । वेगळा दोहीं पासुनी ॥ध्रु.॥देहभोग भोगें घडे । जें जें जोडे तें बरे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असताना त्यांनी ‘मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे पर घर मत बना लेना, मैं समुंदर हूं, लौट कर वापस आउंगा’ ही शायरी बोलले होते।

१८ सप्टेंबर रोजीच्या ‘लोकसत्ता’ संपादकीयमध्ये ‘ठकासी व्हावे ठक। उद्धटासी उद्धट । लौंदासी आणून भिडवावा। दुसरा लौंद,’ रचना मांडण्यात आली आहे.

अभंगांना विरोध करणारी एकमेव महापालिका

सर्वसाधारण सभेत थोर संताचे अभंगाच्या ओळी बोलण्यास विरोध करणारी कल्याण डोंबिवली महापालिका ही कदाचित राज्यातील एकमेव महापालिका ठरली आहे, असे माझे मत आहे. माझ्या भूमिकेला जनतेतून आणि वारकरी संप्रदायातून नक्कीच पाठिंबा मिळेल, हा माझा विश्वास आहे. आपण अभंगाला विरोध करण्याची भूमिका सोडून द्यावी ,अशी माझी आग्रही मागणी आहे, असे म्हात्रे यांनी म्हटले आहे.

‘असाध्य तें साध्य करितां सायास । कारण अभ्यास तुका म्हणे’ ही संत तुकाराम महाराजांची अत्यंत प्रसिद्ध अभंगपंक्ती आहे. ह्याच दोन पंक्ती मला विषयपत्रिकेवरील विषयावर महासभेत बोलायच्या होत्या. संत साहित्याचा मूळ उद्देश आत्मज्ञान मिळवणे, मानवी मूल्यांचे संवर्धन करणे आणि समाजात समता व बंधुभाव निर्माण करणे, अंधश्रद्धा निर्मूलन करणे आणि जनजागृती करणे हा आहे. तोच उद्देश दाबण्याचा प्रयत्न आपल्या माध्यमातून झाला आहे, असे पत्रात म्हटले आहे.