पालिकेच्या डोंबिवली विभागातील बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगूनही डोंबिवली पश्चिमेतील खड्डे भरणीची कामे केली जात नाहीत. त्यामुळे संतप्त झालेल्या डोंबिवली पश्चिमेतील रिक्षा चालकांनी सोमवारी सकाळी अर्धा वेळ रिक्षा बंद ठेऊन रस्त्यावरील खड्डे भरण्याची कामे केली. कोट्यवधीचा अर्थसंकल्प असलेल्या पालिककडे खड्डे भरण्यासाठी निधी नाही का, असे प्रश्न रिक्षा चालकांकडून खड्डे भरणीसाठीचा प्रकार पाहून प्रवासी, पादचारी उपस्थित करत होते.

पावसाळ्यापूर्वी खड्डे भरण्याची कामे पूर्ण करण्यासाठी मार्च-एप्रिलमध्ये शहर अभियंता विभागाकडून निविदा प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक असते. शहर अभियंताकडून त्याची अंमलबजावणी केली जात नाही. पावसाळापूर्वी खड्डे भरण्याची कामांचे प्रस्ताव अद्याप निविदा प्रक्रियेत आहेत. या कामासाठी ठेकेदार नियुक्त करण्यात आले नसल्याने प्रभागातील बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना प्रवासी, रिक्षा, खासगी वाहन चालकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. डोंबिवली पश्चिमेत रस्त्यावरील चऱ्या, खड्डे माती, खडी टाकून तात्पुरती बुजविण्याची कामे अधिकारी करत आहेत.

सततच्या वर्दळीमुळे, पावसाने खडी, माती निघून गेल्याने रिक्षा चालकांना या खड्डयांचा त्रास होत होता. खड्ड्यात प्रवासी बसलेली रिक्षा आपटून रिक्षेचा आस तुटण्याची भिती असते. इतर भाग खिळखिळे होत आहेत. एखादा भाग तुटला की त्यासाठी दोन ते तीन हजार रुपयांचा फटका बसतो. डोंबिवली पश्चिमेतील मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी अनेक वेळा बांधकाम अधिकाऱ्यांकडे केली. त्याची दखल घेतली जात नाही. फक्त खड्डे भरण्याच्या कामाचे आदेश झाले नाहीत, अशी उत्तरे देतात. बांधकाम विभागाकडून खड्डे भरण्याची कामे वेळेत होण्याची शक्यता नाही. त्यामुळे सोमवारी सकाळी श्रमदानातून खड्डे भरण्याची निर्णय घेण्यात आला, अशी माहिती रिक्षा चालक मालक संघटनेचे शेखर जोशी यांनी दिली.प्रवासी वाहतूक थांबवून ३० रिक्षा चालकांनी खडी, माती आणली. ती महात्मा फुले रस्ता, ह प्रभाग, उमेशनगर, विजयनगर भागातील रस्ते माती, खडीने भरले.
अधिक माहितीसाठी कार्यकारी अभियंता विजय पाटील यांना संपर्क केला. त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

पालिकेवर मोर्चा

पालिकेकडून डांबरीकरणातून खड्डे भरणी कधी होणार विचारणा करण्यासाठी रिक्षा चालक मालक संघटनेचे कार्याध्यक्ष शेखर चिटणीस यांच्या मार्गदर्शनाखाली ह प्रभाग कार्यालयासमोर रिक्षा चालक जमा झाले. ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय पालिकेसमोरून न हटण्याचा निर्णय रिक्षा चालकांनी घेतला. ह प्रभाग अधिकारी अधिकारी प्रमोद पाटील रिक्षा चालकांना सामोरे गेले. पाटील यांनी रिक्षा चालकांनी आणलेल्या मोर्चाची माहिती आयुक्त, शहर अभियंता, कार्यकारी अभियंता यांना कळविली. शहर अभियंता विभागात नस्ती मंजूर होण्याची प्रक्रिया संथगतीने होत असल्याने त्याचे चटके प्रवासी, रहिवाशांना बसतात, अशी दबक्या आवाजात अधिकारी चर्चा करतात. शेखर जोशी, भिकाजी झाडे, राजू गुप्ता, मुन्ना यादव, राजा चव्हाण, शिवाजी पाटील, नितीन गवळी, सुरज गुप्ता, भरत झाडे, दत्ता कदम, रवी डोंगरे, विलास बेलकर, प्रदीप शिंदे, राकेश कनोजिया हे रिक्षा चालक या उपक्रमात सहभागी झाले होते.

डोंबिवली पश्चिम विभागातील खड्डे भरणीची कामे येत्या सहा दिवसात पूर्ण केली जातील. यासंदर्भात बांधकाम विभागाच्या वरिष्ठांना कळविण्यात आले आहे. – प्रमोद पाटील ,साहाय्यक आयुक्त ,ह प्रभाग, डोंबिवली

खड्ड्यांमध्ये रिक्षा सतत आपटून रिक्षा खराब होते. प्रवासी वाहतूक करत असताना रिक्षा बंद पडते. या सततच्या खड्ड्यातील आपटयाने रिक्षा चालकांना आठवड्यातून दोन ते तीन हजार रुपये सुट्टे भाग, दुरुस्तीसाठी खर्च करावे लागतात. येत्या सहा दिवसात खड्डे भरणी कामे झाली नाहीत तर पालिकेसमोर ठिय्या आंदोलन केले जाईल. – शेखर जोशी , कार्याध्यक्ष ,रिक्षा चालक मालक संघटना,डोंबिवली