कल्याण – पालिकेतील कामाचा अतिरिक्त भार. तणावात पार पाडलेल्या पालिका निवडणुका. आता सुरू होणारे जगणनेचे काम. त्यात केंद्राचा मतदार याद्या पुनरीक्षणाचा कार्यक्रम. अशा सर्व चिंतामय परिस्थितीत कल्याण डोंबिवली पालिकेत नव्याने निवडून आलेले सर्व पक्षीय नगरसेवक आता कल्याण डोंबिवली पालिका मुख्यालयातील, प्रभागातील अधिकाऱ्यांना संपर्क करून, प्रत्यक्ष कार्यालयात येऊन ‘साहेब, तुम्ही डोंबिवली पश्चिमतील अमुक भागातील बेकायदा चाळींवर कारवाई करू नका. तमुक भागातील चाळींवर मात्र कारवाई करा. आपल्या प्रभागातील आपल्या विरोधकाची वडापाव, पाणीपुरीची हातगाडी उचलून न्या,’ असे फर्मान सोडू लागल्यने पालिका अधिकारी त्रस्त झाले आहेत.
हे नवनिर्वाचित नगरसेवक दहा वर्ष ‘रिकामे’ असल्याने कल्याण डोंबिवली पालिकेत आल्यानंतर आपल्या ‘खोंगळ्या’ भरण्यासाठी आपणास प्रचंड त्रास देतील, अशी भीती पालिका मुख्यालय, प्रभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना आहे. त्याची सुरूवात महापौर, उपमहापौर निवड होण्यापूर्वीच, महासभा अस्तित्वात येण्यापूर्वीच सुरू झाल्याने येणारी पाच वर्ष कशी काढायची या विवंचनेत अधिकारी आहेत. काही सावकार नगरसेवकांची पालिकेतील सद्दी संपली. त्यांची जागा आता काही संत सावकारांनी घेतल्याची चर्चा आहे.
अधिकारशाहीला सुरूवात
कल्याण डोंबिवली पालिका निवडणुका पार पाडल्यानंतर निवडून आलेल्या काही नगरसेवकांनी प्रभागात फेरफटका मारून प्रभागातील सार्वजनिक स्वच्छता, फेरीवाल्यांचा कसा बंदोबस्त कसा करायचा याविषयी पाहणी करून पालिका अधिकाऱ्यांबरोबर सकारात्मक चर्चा केली. बेकायदा इमारती, चाळींमधून दौलतजादा करून नगरसेवक झालेले, फेरीवाल्यांच्या जीवावर उपजीविका करणारे काही बाहुबली नगरसेवक आपण नगरसेवक झालो म्हणजे प्रभागाचे जहागिरदार झालो, अशा अविर्भावात आता प्रभागात फिरत असल्याचे चित्र आहे.
हा सगळा प्रकार पाहून मतदार नागरिकही आश्चर्य व्यक्त करत आहेत. कल्याण, डोंबिवलीत काही प्रभागांमध्ये काही राजकीय कार्यकर्त्यांच्या वडापाव, पाणीपुरी, चायनिजच्या हातगाड्या आहेत. राजकीय वैरामुळे नवनिर्वाचित नगरसेवक आता या वडापाव, चायनिजच्या हातगाड्या उचलून लावण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांवर दबाव टाकत आहेत. हातगाडीवर कारवाई केली तर समोरील हातगाडीचा पाठीराखा नेता दुसऱ्या बाजुने अधिकाऱ्यांना संपर्क करून त्या हातगाड्यांवर कारवाई करायची नाही म्हणून दमबाजी करत आहे. या दोन्ही बाजुने होणाऱ्या कोंडीत प्रशासकीय काम कसे करायचे, असे प्रश्न अधिकाऱ्यांना पडले आहेत. या सगळ्या प्रकारात प्रभागात काम करणारे साहाय्यक आयुक्त सर्वाधिक त्रस्त झाले आहेत.
‘व्हीआरएस’ची तयारी
काही पालिका अधिकारी सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. नगरसेवकांकडून असा सतत त्रास होणार असेल तर हे अधिकारी स्वेच्छा निवृत्ती (व्हीआरएस) घेण्याचा विचार करत आहेत. काही अधिकारी बदलीच्या प्रयत्नात असल्याचे समजते. मागील २५ वर्षाच्या कालावधीत पालिकेतील अनेक अधिकारी महासभेत सर्व पक्षीय नगरसेवकांनी ‘ठरवून’ आणलेल्या विषयांमुळे पदोन्नत्ती, विभागीय चौकशा, फेरीवाल्यांचे विषय, बेकायदा बांधकामे या विषयांवरून अडचणीत आले. तेच विषय पुन्हा पालिका महासभेत चर्चेला येण्याची शक्यता असल्याने नाहक डोकेदुखी आणि आपल्या ३० ते ३५ वर्षाच्या नोकरीला डंख नको म्हणून पालिका सेवेतील काही अधिकारी स्वेच्छा निवृत्ती घेण्याचा विचार करत आहेत. त शासन सेवेतील अधिकारी नगरसेवकांच्या रोषाला सामोरे जावे लागू नये म्हणून पालिकेतील आपला सेवाकाळ संपण्यापूर्वीच निघून जाण्याच्या तयारीला लागल्याची चर्चा आहे.

