कल्याण – कल्याण डोंबिवली पालिकेच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानातील सुमारे दोनशे कर्मचारी गेल्या चार महिन्यांपासून वेतन मिळत नसल्याने अस्वस्थ आहेत. वेतन मिळावे म्हणून पालिकेच्या वरिष्ठांकडे तगादा लावूनही त्याची दखल घेतली जात नसल्याने अखेर बुधवारी या कर्मचाऱ्यांनी कल्याणमध्ये पालिका मुख्यालयात येऊन आरोग्य विभागाच्या प्रमुखांची भेट घेतली आणि वेतन तातडीने देण्याची मागणी केली.

तसेच, वेतन देण्यात आले नाहीतर काम बंद आंदोलन करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला. या कर्मचाऱ्यांमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानातील (पंधरावा वित्त आयोग) डाॅक्टर, परिचारिका, बहुउद्देशीय कर्मचारी यांचा समावेश आहे. यापूर्वीही या कर्मचाऱ्यांचा पगार एक ते दोन महिन्यांनी होत होता. आता चार महिने होत आले तरी वेतन मिळत नसल्याने अनेक कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे.

आम्ही घरे घेतली आहेत. त्या घरांचे बँक कर्जाचे हप्ते आमच्या वेतनातून जातात. वेतन नसल्याने ते हप्ते थकले आहेत. आमची मुले शाळेत जातात. त्यांचे शैक्षणिक आणि इतर शुल्काचा प्रश्न निर्माण झाला आहे. घरात ज्येष्ठ, वृध्द आहेत. त्यांचे आजार, दैनंदिन प्रवास खर्च. वेतन नसल्याने हे सर्व प्रश्न गंभीर स्वरूप धारण करून उभे आहेत. आम्हाला फक्त वेतन मिळेल, अशी आश्वासने प्रशासनाकडून मिळतात. प्रत्यक्षात त्याच्यावर कार्यावाही होत नाही, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

राष्ट्रीय आरोग्य अभियान विभागाकडून पालिकेला वेतन निधी आला आहे, असेही सांगण्यात येते. मग, आम्हाला वेतन देण्यास टाळाटाळ कोण करतो याची चौकशी करण्याची मागणी या कर्मचाऱ्यांनी केली. पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डाॅ. दीपा शुक्ल यांची भेट घेतली. त्यांच्याकडून वेतन कधी होईल याची ठोस माहिती दिली जात नाही. किंवा त्यांच्या बोलण्यातून वेतन होण्याची कोणतीही स्पष्टता दिसत नाही, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

हातात निषेधाचे फलक घेऊन सुमारे दोनशे कर्मचारी बुधवारी पालिका मुख्यालयाच्या आवारात धडकले. यावेळी सुरक्षा यंत्रणांची धावपळ उडाली. कर्मचाऱ्यांनी पालिका मुख्यालयाच्या प्रवेशव्दारावरासमोर उभे राहून आपला निषेध नोंदविला. कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने एक निवेदन पालिका आयुक्त, वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांना कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने दिले. राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी दिली जाते. ही वेतनश्रेणी आम्हाला देण्यात आलेली नाही.

महागाई भत्ता दिला जात नाही. वसई विरार, उल्हासनगर, ठाणे पालिकांमध्ये अभियानातील कर्मचाऱ्यांचे नियमित वेतन होते. त्यांना नियमित वेतनश्रेणी दिल्या जातात, महागाई भत्ता मिळतो मग कल्याण डोंबिवली पालिकेत कोणती अडचण आहे, असे प्रश्न कर्मचारी उपस्थित करत आहेत. या सर्व प्रक्रियेत आरोग्य विभागात खिलाडी म्हणून ओळखला जाणारा एक माजी कर्मचारी कोलदांडा टाकत असल्याची पालिका मुख्यालयात कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा आहे. अधिक माहितीसाठी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डाॅ. दीपा शुक्ल यांना संपर्क साधला. त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.