कल्याण: कल्याण-डोंबिवली पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागातील फार्मासिस्ट अनिल शिरपूरकर यांना पालिकेत केलेल्या आर्थिक गैरवर्तणुकीसंदर्भात आयुक्त अभिनव गोयल यांनी महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक, सेवा आणि शिस्त तरतुदीमधील शिस्तभंग विषयक कारवाईच्या अनुषंगाने शिक्षा म्हणून एक वार्षिक वेतनवाढ एक वर्षाकरिता पुढील वेतनवाढीवर परिणाम न होता तात्पुरती रोखण्याचा निर्णय घेतला आहे. आयुक्तांच्या या निर्णयाने तक्रारदारांनी तीव्र नाराजी व्यक्त करून या निर्णयाला शासनस्तरावर आव्हान देण्याची तयारी केली आहे.

फार्मासिस्ट शिरपूरकर यांच्याप्रमाणे कल्याण डोंबिवली पालिकेत एक साहाय्यक आयुक्त दर्जाचा अधिकारी आणि एक फार्मासिस्ट यांनी प्रशासनाला अंधारात ठेऊन दुहेरी आर्थिक लाभ घेतला होता. याप्रकरणीच्या चौकशीत हे दोन्ही पालिका कर्मचारी दोषी आढळल्याने तत्कालीन पालिका प्रशासनाने त्यांना दुहेरी लाभ प्रकरणी पालिका सेवेतून बडतर्फ केले होते. अशीच कार्यवाही शिरपूरकर यांच्यावर न करता प्रशासनाने त्यांना किरकोळ शिक्षा देऊन पाठबळ दिल्याच्या प्रतिक्रिया या प्रकरणातील तक्रारदार माहिती अधिकार कार्यकर्ते मनोज कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते गणेश ताटे यांनी दिल्या. ‘लोकसत्ता’ सहदैनिकाने गेल्या वर्षी हे प्रकरण उघडकीला आणले होते. त्यानंतर याप्रकरणाची चौकशी सुरू झाली होती.

काय आहे प्रकरण?

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत १५ व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून ३५ शहरी आरोग्यवर्धिनी केंद्रे आणि ५ बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना केंद्रे सुरू आहेत. ३७ केंद्रे पालिकेच्या जागेत आणि उरलेली तीन केंद्रे भाडेतत्वावरील जागेत आहेत. डोंबिवली जवळील भोपर देसलेपाडा येथील लोढा हेरिटेज वास्तु सृष्टीमधील दोन गाळे एकत्रित करून, पालिकेने धीरजकुमार पांडे (गाळा आकार ३०० चौ. फूट.), फार्मासिस्ट अनिल शिरपूरकर (गाळा आकार २५० चौ. फूट) यांच्याकडून भाड्याने घेतले आहेत.

पालिकेने शिरपूरकर, पांडे यांच्याशी भाडे करारनामा करून दरमहा ३३ हजार ७४१ भाडे स्वीकृतीला मंजुरी दिली आहे. मे २०२३ ते मार्च २०२५ या २३ महिन्यांच्या कालावधीसाठी हा करारनामा आहे. हा भाडे करार एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ पर्यंत नुतनीकरण करण्यात आला होता.

शिरपूरकर दोषी

शासकीय कर्मचाऱ्याने शासन सेवेत असताना महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम १९७९ मधील नियम १७(२) अन्वये अन्य कोणत्याही आस्थापनेत नोकरी, उद्योग, व्यवसाय करून दुहेरी आर्थिक लाभ घेऊ नये, असा नियम आहे. शिरपूरकर यांनी आपण पालिका सेवेतील कर्मचारी आहोत हे माहिती असुनही आपला देसलेपाडा येथील वास्तु सृष्टीमधील गाळा पालिकेला भाड्याने देऊन पालिकेतून वेतनाबरोबर गाळे भाड्याच्या माध्यमातून दुहेरी आर्थिक लाभ घेतला, असे प्रशासनाने केलेल्या चौकशीत निष्पन्न झाले. शिरपूरकर यांनी महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम १९७९ मधील नियम १७(२) चे उल्लंघन केले आहे, असे आयुक्त गोयल यांनी शिरपूरकर यांच्यावरील शिक्षेच्या कारवाई आदेशात म्हटले आहे.

खुलासा फेटाळला

या शिस्तभंग प्रकरणी प्रशासनाने शिरपूरकर यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली होती. त्यावर त्यांनी दिलेला खुलासा प्रशासनाने अमान्य केला आहे. दुहेरी आर्थिक लाभाच्या गैरवर्तणुकीबाबत शिरपूरकर यांची पुढील एक वार्षिक वेतनवाढ शिक्षा म्हणून पुढील एक वर्षाकरिता पुढील वेतनवाढीवर परिणाम न होता तात्पुरत्या स्वरूपात रोखण्यात येत आहे, असे आयुक्त गोयल यांनी कारवाई आदेशात म्हटले आहे.

फार्मासिस्ट शिरपूरकर यांनी दुहेरी आर्थिक लाभाची गैरवर्तणूक करूनही प्रशासनाने एक वेतनवाढ रोखण्याची शिक्षा देऊन त्यांची पाठराखण केली आहे. यासंदर्भात मी नगरविकास विभागाकडे तक्रार करून सखोल चौकशीची मागणी करणार आहे. – गणेश ताटे, सामाजिक कार्यकर्ते.