कल्याण – कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील खड्डे भरण्यासाठी प्रशासनाने २५ कोटीची तरतुद केली आहे. पालिका हद्दीतील खड्यांची चाळण झाली आहे. प्रवासी खड्ड्यांनी त्रस्त आहेत. तरीही पालिकेच्या ठेकेदारांकडून खड्डे भरणी केली जात नसल्याने आणि अधिकारी ढिम्म असल्याने त्याचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी कल्याणमध्ये काँग्रेस पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्त्यांकडून खड्ड्यांचे पूजन आणि खड्डे भरणीचा कार्यक्रम करण्यात आला.

कल्याण शहर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. नवीन सिंग यांच्या नेतृत्वाखाली हे निषेध आंदोलन करण्यात आले. मुसळधार पावसाने कल्याण, डोंबिवली पालिका हद्दीतील डांबरी रस्त्यांची चाळण झाली आहे. या रस्त्यांवरून प्रवास करताना वाहन चालक, प्रवाशांना त्रास होत आहे. खड्ड्यांमुळे वाहने संथगती धावतात. त्यामुळे कल्याण, डोंबिवली शहरात वाहतूक कोंडी वाढली आहे. खड्ड्यांमुळे विविध समस्या निर्माण होत असताना पालिका प्रशासन, ठेकेदार बघ्याची भूमिका घेत असल्याने या गंभीर विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी काँग्रेसतर्फे खड्डे पूजनाचा कार्यक्रम कल्याणमध्ये आयोजित केला होता. या पूजनानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी खड्डे भरणीची कामे केली.

जिल्हाध्यक्ष ॲड. नवीन सिंग यांनी सांगितले की, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने शहरातील खड्डे आणि चऱ्या भरण्यासाठी सुमारे २५ कोटी ७० लाखांची निविदा काढली आहे. मग हे पैसे नेमके कुठे गेले? कोणत्या कामांवर खर्च करण्यात आले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

ते पुढे म्हणाले की, शहरातील प्रमुख रस्त्यांवर आजही मोठ्या प्रमाणात खड्डे असल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत, वाहनांचे नुकसान होत आहे. आणि अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. इतका मोठा निधी खर्च झाला असेल, तर त्याचे प्रत्यक्ष काम शहरात का दिसत नाही? असा प्रश्न त्यांनी केला. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त आणि महापौर यांनाही थेट इशारा देत सिंग यांनी सांगितले की, येत्या सात दिवसांच्या आत कल्याण-डोंबिवली शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवरील खड्डे तातडीने भरावेत. अन्यथा काँग्रेस पक्षाच्यावतीने कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन छेडण्यात येईल आणि या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल. तरतुद करूनही निधी खर्च न करणे हा प्रकार जनतेच्या पैशांचा गैरवापर असून जनतेशी झालेला मोठा विश्वासघात आहे, असा आरोप त्यांनी केला.

या आंदोलनात सलीम शेख, सत्यभामा जयसवार, रीना खांडेकर, वर्षा रसाल, अजीत सिंह, अमोल गायकवाड, इमरान शेख, रंजित दांगले, आजम शेख, सुभाष सिंह, सुशील उपाध्याय, मोहन गुप्ता, वजाहत खान, चेतन भंडारी, विमलेश शर्मा, वैभव पाठक, श्रेयस सिंह, किशोर मढवी, फिरोज शेख यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले. यावेळी खड्डेमुक्त कल्याणची मागणी करत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.